घोडपेठ : येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गावरून चार किलोमिटर आतमध्ये असलेले गोरजा हे गाव ब-याच सोयी सुविधांपासून वंचित आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या आवश्यक गोष्टींसाठी गोरजावासियांना घोडपेठ किंवा भद्रावती येथे जावे लागते. गोरजा येथे अजुनपर्यंत महामंडळाची बसही पोहचली नाही. त्यामुळे गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान यासारख्या स्वच्छतेला प्रोत्साहन देणा-या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र गोरजा येथील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेबद्दल जागरूक नसल्याचा प्रत्यय येत आहे. त्यातच गावातील मुख्य रस्त्याला भलेमोठे भगदाड पडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा खड्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी बाजूलाच आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या बाबीवर पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला एखाद्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्याची ताबडतोब दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
गोरजा येथील मुख्य रस्त्याला भगदाड
By admin | Updated: May 17, 2015 01:29 IST