विविध उपक्रम : विजय वडेट्टीवार यांचा पुढाकारब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावतीने ब्रह्मपुरी महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी, लोकांचा, लोकांसाठी लोकोत्सव म्हणून ब्रह्मपुरी महोत्सव नवीन वर्षाच्या सुरुवातीला ब्रह्मपुरी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महानाट्य, चर्चासत्र, ब्रह्मपुरी भुषण पुरस्कार, प्रगतशिल शेतकरी पुरस्कार, विविध स्टॉल, कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा राहणार आहेत. चार दिवस रंगणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन २ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार राहणार आहे. २ ते ५ जानेवारी २०१६ पर्यंत होणाऱ्या या चार दिवसीय महोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मपुरी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्या निर्माण करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून महानाट्याचे दोन स्टेज, स्टॉल, विविध कार्यक्रमासाठी स्टेजची कामे जोरात सुरू असून अंतिम टप्प्यात काम आले आहे. या महोत्सवामध्ये अनेक सिने कलावंत भेट देणार आहेत. कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ हा एकमेव उद्देश असून हा महोत्सव ब्रह्मपुरी क्षेत्रात आनंद देणारा व त्यांच्या पसंतीस उतरणारा सोहळा राहणार आहे. नावीन्यपूर्ण व मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे ब्रह्मपुरी महोत्सवाची ओळख निर्माण होणार आहे.२ जानेवारीला ब्रह्मपुरी महोत्सव समिती आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८ ते १२ पर्यंत नगर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून दुपारी २ ते ४ या वेळात झांकी प्रदर्शन व रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता ब्रह्मपुरी महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होईल. आमदार विजय वडेट्टीवार अध्यक्षस्थानी राहणार असून नगराध्यक्ष रिता उराडे, माजी आमदार उद्धवराव शिंगाडे, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, मिहानचे अधिकारी सुभाष चहांदे, मनोहर पाऊनकर, अशोक भैय्या, मारोतराव कांबळे, प्रकाश देवतळे, दामोधर मिसाळ, अशोक रामटेके यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ५ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता समारोप कार्यक्रम सिने अभिनेता तथा खासदार राज बब्बर यांच्या उपस्थितीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून नगराध्यक्षा रिता उराडे, सावलीच्या नगराध्यक्षा रजनी भडके, दिनेश चिटनुरवार, प्रभाकर सेलोकर, राजेश सिद्धम, अरुण कोलते, प्रफुल खापर्डे, राजू देवतळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत रजनी हा कार्यक्रम होणार असून उद्घाटन विलास विखार यांच्या हस्ते मनोज कावळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
२ जानेवारीपासून ब्रह्मपुरी महोत्सव
By admin | Updated: December 31, 2015 01:16 IST