चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसह बीपीएल, एपीएल लाभार्थ्यांना डावलून गावात वास्तव्य नसलेल्या नागरिकांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून त्यांच्या नावाने धान्याची उचल करण्यात आल्याचा प्रकार नांदा, नांदाफाटावासींनी मंगळवारी उजेडात आणला.या दोन्ही गावात रेशनदुकानदाराकडून कार्डधारकांची लुट सुरू आहे. या दुकानदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशीच्या मागणीसाठी या दोन्ही गावांतील शेकडो नागरिक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर धडकले.नांदा, नांदाफाटा येथे किसन गोंडे, कुसराम यांंचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दोन्ही दुकानातून लाभार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. माात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. इरफान सिद्दीकी, कोनगोंडा लक्ष्मीबाई, ज्योती हुडरे, शकील मोहंंमद, अशोक शुक्ला, शैलेश गाडेकर, घनश्याम धारवटकर, विजय नीत, पासवान रामबलिराम, सुभाष किन्नाके, किशोर डंबारे, पद्मा पोतलवार हे गावात राहात नाहीत. तरीही त्यांच्या नावाने फेब्रुवारी ते जून महिन्यांपर्यंत धान्याची उचल करण्यात आल्याची बाब ‘माहिती अधिकारा’ तून उजेडात आली. शर्मा रंगईलाल, सुनील बावणे, वैलांती प्रांजीय, मंदाबााई पुल्लमवार, नारायण सोरते, जयश्री चव्हाण, गोंडीनबाई गेडाम, भगवान पाईकराव, गोपीचंद आडे यांच्यासह अन्य नागरिकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट आहेत. मात्र त्यांना अजूनपर्यंत धान्य देण्यात आले नाही. मात्र दुसरीकडे विक्री पुस्तिकेत धान्य उचल करण्यात आल्याची नोंद स्वस्त धान्य दुकानदाराने केली आहे.अन्नसुरक्षा लाभार्थ्यांना त्यांच्या युनिटप्रमाणे गहू २ रुपये, तांदूळ ३ रुपये किलोने द्यावे, धान्याची उचल करताना रीतसर बिल देण्यात यावे, मनमानी कारभार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावकरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आडे यांना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)
बोगस लाभार्थ्यांच्या नावाने धान्याची उचल
By admin | Updated: July 23, 2014 23:33 IST