चंद्रपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजप व काँग्रेसला नको आहे. ओबीसींची जनगणना आजतागायत केली नाही. सरकारला न्यायालयात ओबीसींची संख्या सांगता येत नाही, याला जबाबदार कालचे सत्ताधारी काँग्रेस व आजचे सत्ताधारी भाजप आहेत. भाजप व काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीच्या राज्य अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केला.
चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने स्थानिक एका हॉटेलमध्ये संघटन समीक्षा व संवाद यात्रा सभा मंगळवारी पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. रेखा ठाकूर म्हणाल्या, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व महानगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आताच आपण कामाला लागले पाहिजे. आपल्या पक्षाकडे निधीची कमतरता आहे. मात्र आपल्याकडे बाळासाहेब आंबेडकर यांचा जनाधार आहे. यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. संघटनेत कृतिशील कार्यकर्ते आधार आहेत. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा जनाधार व जिवाभावाची कार्यकर्ते पक्षाची ताकद आहे. आगामी निवडणुकीत सत्ता संपादन करून वंचितांना न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. यातूनच बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होणार आहे, असेही रेखा ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी मंचावर गोविंद दळवी, अरुंधती सिरसाट, डॉ. रमेश गजभे, राजू झोडे, कुशल मेश्राम, डॉ. प्रवीण गावतुरे, राजू लोखंडे, बंडू ढेंगळे, अरविंद संदेकर, तनुजा रायपुरे, कविता गौरकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. संचालन जयदीप खोब्रागडे, तर आभार कुशल मेश्राम यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.