तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठी असलेल्या विसापूर वगळता इतर ग्रामपंचायतींत भाजपप्रणीत उमेदवारांना चांगले यश मिळाले आहे. हडस्ती येथील सातही जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. विसापूर येथील वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीने १७ पैकी नऊ जागा पटकाविल्या. सरत्या सत्रात विसापुरात काँग्रेसची सत्ता होती. आता काँग्रेसला येथे दोनच जागा मिळाल्या. नांदगाव पोडे येथे भाजपाने काँग्रेसवर मात केली आहे. पळसगाव, कळमना, मानोरा आमाडी याठिकाणी भाजपने दावा केला आहे. बल्लारपूर पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती इंदिरा रमेश पिपरे यांच्या क्षेत्रात ही गावे येतात. किनीत मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. एकूण ९२ मधून भाजपाने ५२ जागा जिंकल्याचे सांगितले आहे.
सोमवार सकाळी १० वाजता मतमोजणीला येथील उपविभागीय कार्यालयातील सभागृहात सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ती चालली. तहसीलदार संजय राईचवार यांच्या देखरेखीखाली मतमोजणीचे काम चालले.
बॉक्स
केवळ एका मताने विजयी
पळसगाव येथील प्रभाग तीनमध्ये स्नेहा चंद्रकांत खाडे या एका मताच्या फरकाने निवडून आल्या. त्यांना २२३ तर त्यांच्याविरोधात असलेल्या कल्पना ऋषी देव वासाडे यांना २२२ मते मिळाली. त्याचप्रमाणे त्याच प्रभागातील क मध्ये माधुरी सुरेश वडरे या दोन मतांनी विजयी झाल्या. त्यांना २२२ तर प्रतिस्पर्धी कीर्ती प्रशांत झाडे यांना २२० मते मिळाली.