बल्लारपूर : बल्लारपूर बामणी ते गोंडपिपरी या महामार्गाला लागून असलेल्या ठिकठिणच्या बीच मार्गावर ( जोड रस्ता) आत बरीचशी गावे आहेत. जोड रस्त्यावर त्या गावांच्या नावाच्या पाट्या लावून नसल्याने, आतील गावांची नावं कळत नव्हती. आता, या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर सोबतच प्रत्येक जोड रस्त्यावर आतील गावांच्या ठळक अक्षरातील पाट्या लावल्यामुळे आतील गावांच्या नावाला ओळख मिळू लागली आहे.
यामुळे, आतील भटाळी, देवई, आष्टा, डूबगोला, पल्लोर, कवडजई, कोर्टीमत्ता, गिलहरी, किन्ही, इत्यादी जंगल मार्गावरील गावे प्रकाशझोतात आली आहे. तद्वतच, नवीन प्रवाशांकरिता ते सोयीचेही झाले आहे. इतर महामार्गावरही अशी सोय करायला हवी.
बॉक्स
काही गावांची नावं चुकीची
या मार्गावरील पोंभुर्णा या गावाचे नाव पोभुर्णा तसेच धाबा या गावाचे नाव ढाबा असे पाट्यांवर चुकीचे लिहिण्यात आले आहे. ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. या मार्गावरील काही भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला पळसाचे मोठाले वृक्ष होते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान आलेल्या पळस फुलांनी तो परिसर बाहेरून लक्षवेधी ठरायचा. चौपदरीकरिता त्यातील बहुतेक पळसाच्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्यामुळे आता पळस फुले दिसेनासी झाली आहेत. महामार्ग प्रशस्त आणि वाहतुकीला सोयीचा झाला. पण, मनमोहक पळस फुलांना हा मार्ग पारखा झाला आहे. ही एक खंत!