फोटो
सचिन सरपटवार
भद्रावती : शाळेत शिकत असताना ज्यांच्यावर शाळेची प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणण्याची जबाबदारी होती. ज्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्र सेवा करण्याची जिद्द होती. त्याच हेमंत नामदेव नगराळे या भद्रावतीच्या सुपुत्रावर महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाची आज जबाबदारी आली आहे. भद्रावतीकरांसाठी हा क्षण खऱ्या अर्थाने अभिमानास्पद ठरणारा आहे या नियुक्तीमुळे भद्रावती नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हेमंत नामदेव नगराळे यांचा जन्म भद्रावती येथे झाला. त्यांचे एक ते सहा वर्गापर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद विद्यालय भद्रावती येथे झाले .त्यानंतर त्यांचे शिक्षण नागपूर येथे झाले. मेकॅनिकल इंजिनियर व फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केले.
हेमंत नगराळे यांचे वडील मध्य प्रदेश येथे पाटबंधारे विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. मूळचे भद्रावती येथील हेमंत नगराळे यांनी आयुध निर्माणी भंडारा येथे असिस्टंट वर्क्स मॅनेजर म्हणून नोकरीला सुरुवात केली. १९८७ मध्ये ते आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर राजुरा येथे नक्षल क्षेत्रासाठी त्यांची स्पेशल अपॉइंटमेंट करण्यात आली. त्यांना आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
काही वर्षांपूर्वी ते भद्रावतीला आले असता ज्या ठिकाणी त्यांनी बालपणी शिक्षण घेतले, त्या जिल्हा परिषदेच्या दोन्ही शाळांना त्यांनी भेटी दिल्या. वर्गात ज्या ठिकाणी ते बसत होते, ती जागा पाहिली.
बॉक्स
बालमित्रांत झाले होते रममाण
भद्रावती नगरपरिषदद्वारे त्यांना भद्रावती भूषण पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे बालमित्र राजू मुरलीधर गुंडावार यांच्या घरी अन्य बाल मित्रांसोबत आठवणींना उजाळा दिल्या गेला. किल्ल्यात खेळणे, आमराईतले आंबे अशा विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यावेळेस त्यांचे बालमित्र राजू गुंडावर, जावेद शेख, अखिल शहीद, बाबा मिलमिले , दिलीप चटपल्लीवार, गिरीश पद्मावार, पुरुषोत्तम उमरे व अन्य मित्र उपस्थित होते.