टेमुर्डा : मागील वर्षी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा आयुर्वेदिक दवाखान्याने महाराष्ट्रातील प्रथम बीएफएचआय (बेबी फेंडली हेल्थ इनिशियेटिव्ह) संस्था बनण्याचा मान पटकावला. त्याच धर्तीवर आता प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार सुद्धा बीएफएचआय संस्था बनण्यासाठी वाटचाल करीत आहे. यामुळे परिसरातील माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी होऊन कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसारला बीएफएचआय श्रेणीत आणण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी प्रयत्नाला सुरुवात केली आहे. त्याकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य व वरोरा येथील सीडीपीओ कारदार यांनी सर्व आरोग्य व आयसीडीएस कर्मचाऱ्यांची एकत्रित सभा घेऊन गरोदर-स्तनदा माता व्यवस्थापन, शिशु पोषण व स्तनपान बाबत प्रशिक्षण घेण्यात आले. माता व बालकाची योग्य काळजी कशी घ्यावी, यासाठी आरोग्य तसेच आयसीडीएस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कुटुंबाला भेट देणार आहेत. माता व बाल संगोपन, स्तनपान, आहार व विश्रांतीचे महत्त्व याबाबत शास्त्रीय माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. गृहभेटीमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय वरिष्ठ अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनासुद्धा सहभागी होण्याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी आवहन केले आहे. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होणाऱ्या सर्व प्रसुती या ‘ब्रेस्ट कॉल’ पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे मातेला प्रसुतीपश्चात अतिरिक्त रक्तस्त्राव होणार नाही तसेच प्रसूतीनंतर त्वरित स्तनपानाच्या सुरुवातीमुळे नवजात शिशुचे स्वास्थ उत्तम राहील. बाळाला सहा महिण्यापर्यंत वरचे कोणतेही पदार्थ न देता फक्त मातेचे दूधच देण्यासाठी तसेच दुधाच्या बाटलीचा उपयोग बंद करण्यासाठी महिला मंडळ व सामाजिक संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात गावागावातील आरोग्य व पोषण समिती गावात आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविणार असल्याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्य व सीडीपीओ कारदार यांनी दिली आहे. याची वाटपचा सुरू झाली आहे. (वार्ताहर)
कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्र बनणार बीएफएचआय संस्था
By admin | Updated: March 14, 2016 01:04 IST