चंद्रपूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई)च्या निर्णयानुसार गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतील, मात्र हा निर्णय रिक्त जागा भरण्यासाठी घेतला असला तरी तो अभियांत्रिकी कमकुवत करण्याचा प्रकार असल्याचे काहींचे मत आहे. तर अन्य विषयांतील विद्यार्थ्यांना इंजिनिअर होता येणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या वर्षापासून बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र न शिकणारे विद्यार्थीही अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. एआयसीटीईच्या सुधारित नियमांनुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता असेल आणि १४ विषयांच्या यादीतील तीन विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने घेतल्याचे सांगितले जाते. विद्यार्थी त्याच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर इतर आवडीच्या विषयात शिकायचे असल्यास ते तो विषय शिकून त्याबद्दलचे प्राप्त क्रेडिटस त्याच्या एबीसीमध्ये जमा करू शकतो.
बाॅक्स
अभियांत्रिकीचा पाया ठिसूळ करणे अयोग्य ?
गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शाखेचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आता तर मेडिकल सायन्स व इतर अभ्यासक्रमामध्येही गणित, रसायनशास्त्र यासारख्या विषयांचे ज्ञान असणे उपयोगीच ठरते. त्यामुळे इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होण्यासाठीचे विषयच प्रवेशासाठी नसणे हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तयार होणाऱ्या इंजिनिअर्सचा पाया ठिसूळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या
०४
सरासरी रिक्त जागा
४५
कोट
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान न होता त्यांचा फायदाच होणार आहे.
सुधीर ग. आकोजवार
प्राचार्य
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर