रामबागमध्ये कैद : अनेक दिवसांपासून वावरदुर्गापूर: दुर्गापूर परिसरात गत अनेक दिवसांपासून वावर असलेल्या एका मादी अस्वलाला गुरूवारी दुपारी दुर्गापूर वेकोलि वसाहतीत वनविभागाने इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करुन तिला जेरबंद केले. सध्या तिला रामबाग नर्सरीत ठेवण्यात आले आहे.दुर्गापूर परिसरात मागील दोन वर्षांपासून नागरिकांना ठिकठिकाणी अस्वल दर्शन देत होती. ती दिवसाढवळ्या वस्तीत यायची. वस्तीतील झाडावर चढून मधमाशाचे पोळे खात असताना वसाहतीतील शेकडो नागरिकांनी तिला बघितले आहे. कधी दुर्गापूर कोळसा खाणीच्या एचईएमएम प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात मुक्तपणे संचार करतानाही नागरिकांनी अनेकदा पाहिले आहे. ६ आॅक्टोबरला दुर्गापूर कोळसा खाणीच्या गुणवत्ता चाचणी विभागाच्या आवारात ही अस्वल होती. येथील कर्मचारी सुरेंद्र बोरकर यांनी याची माहिती वनविभागाला दिली. ७ आॅक्टोबरला दुर्गापूर परिसरात असलेल्या आश्रमशाळेजवळ तेथील विद्यार्थ्यांना ती दिसली.चंद्रपूर वनविभागाने याची दखल घेत बुधवारी दुपारी ४ वाजतापासून अस्वलाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. अगोदर लावलेल्या पिंजऱ्यात ती शिरत नव्हती. नंतर जाळ्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाचे ते प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तिला वेकोलि वसाहतीतील डीएमआर क्वॉर्टरजवळ गनद्वारे बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात ती बेहोश झाली. लगेच तिला पिंजऱ्यात टाकून रामबाग नर्सरीत आणण्यात आले. ती मादी असून वयस्क आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे यांनी वैद्यकीय तिची चाचणी केली. त्यात ती तंदुरुस्त असल्याचे सांगितल्या गेले आहे. ही कारवाई चंद्रपूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात रॅपीड रिसोर्स युनिट व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (वार्ताहर)
दुर्गापूर वसाहतीत अस्वलीला पकडले
By admin | Updated: October 9, 2015 01:40 IST