बंजारा समाजाने उत्कर्ष साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:22 PM2018-03-08T23:22:17+5:302018-03-08T23:22:17+5:30
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीतून निपजलेले अनेक महापुरूष व थोर महात्म्यांनी या संत महात्मांचा उपदेश आणि विचारातून पे्ररणा घेत असामान्य कर्तृत्व गाजवले आहे.
आॅनलाईन लोकमत
जिवती : महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीतून निपजलेले अनेक महापुरूष व थोर महात्म्यांनी या संत महात्मांचा उपदेश आणि विचारातून पे्ररणा घेत असामान्य कर्तृत्व गाजवले आहे. मानवतेच्या धर्माचे पालन करीत लोकसेवा केली आहे. संतांचे विचार मानवी उत्कर्षासाठी सदैव कल्याणकारी ठरले आहेत. संत सेवालाल महाराज यांनीही याच विचारांचा पुरस्कार केला. त्यामुळे बंजारा समाजबांधवाने विविध क्षेत्रामध्ये पुढे येण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिवती तालुक्यातील परमडोली तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बंजारा समाजाचे प्रेम सिंह महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, किसान आघाडीचे महासचिव राजू घरोटे, भाजपाचे विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, पं. स. सभापती सुनील मडावी, पं. स. उपसभापती महेश देवकते, जि. प. सदस्य कमलाबाई राठोड, भाजप तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, तेलंगनाचे अब्दुल कलाम, सुरेश केंद्रे, गोंविद नाईक, उत्तम राठोड, दत्ता राठोड, गोपीनाथ चव्हाण, सरपंच लक्ष्मण कांबळे, उपसरपंच ईश्वर आडे, चंदु पवार, वामन पवार आदींची उपस्थिती होती.
ना. अहीर पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा व उदांत्त विचारांचा वारसा जोपासणारा समाज म्हणून बंजारा बांधवांकडे पाहण्यात येते. मात्र दुदैवाने हा समाज विकासापासून वंचित आहे. भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ या समाजातील बांधवांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्यानंतर उपसभापती महेश देवकते, अब्दुल कलाम, उपसरपंच ईश्वर आडे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला जिवती तालुक्यासह तेलंगणा राज्यातील बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.