ब्रह्मपुरी : शहरासह तालुक्यातील १५० ते २०० कुटुंब बांबू पासून निरनिराळे वस्तू बनवून आपली उपजीविका भागवीत असतात. मात्र, या बुरड व्यवसायिकांना एक ते दीड वर्षांपासून वन विभागाने बांबू न पुरविल्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.प्लास्टिकच्या युगात बांबूपासून बनविलेल्या वस्तूंना फारशी मागणी नाही. मात्र, बांबूच्या काही वस्तू गृहोपयोगी म्हणून आवश्यक ठरल्या आहेत. टोपल्या, सुप, बेंडवे आदी वस्तू प्लास्टिकच्या बनविल्या जात नाही. उलट त्या वस्तू बांबूपासून बनविल्याने महत्त्वपूर्ण ठरत असतात. परंतु, मागील एक ते दीड वर्षापासून बुरड व्यवसायिकांना चांगल्या प्रतीचा बांबू पुरविण्यात आलेला नाही. त्यामुळे पारंपारिक धंदा डबघाईस आलेला आहे. बुरड व्यवसायिकांना पुरविण्यात येणारा बांबू अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यांना पुरविण्यात येत आहे. त्यामुळे बुरड व्यावसायिकांना नेहमीच वनविभागाकडून टंचाई भासवली जात आहे. एखाद्या वेळी बांबू दिल्या गेल्या तर तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असते. त्यामुळे वस्तू बनविण्यात अडथळा निर्माण होऊन चांगल्या प्रतिचा माल तयार होत नसल्याचेही बुरड व्यवसायिकांकडून सांगितल्या जात आहे. पारंपारिक धंद्याला लागणारा बांबू पुरविल्या जात नसल्याने धंदा ठप्प झाला आहे. म्हणून कुटूंबातील काही कर्ते पुरुषमंडळी रिक्शा चालविणे, हमाली करणे व मिळेल तो काम करण्यावर अवलंबून राहून आपली उपजीविका भागवित आहेत. शासनस्तरावर या अन्यायाप्रती आवाज उठविला आहे. परंतु, याकडे कोणाचेही लक्ष नाही. पारंपरिक व्यवसायाला बांबू पुरविण्यात वनविभाग असमर्थ असेल तर प्रत्येक कुटुंबाला शासनाने कमीतकमी पाच एकर शेती पोट भरण्यासाठी द्यावी, अशी मागणी बुरड समाजातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बांबूअभावी बुरड व्यवसाय धोक्यात
By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST