मस्कऱ्या गणेश उत्सव : दर्शनासाठी भाविकांच्या रांगा भद्रावती : येथील धार्मिक स्थळांची महती सातासमुद्राकडे पसरली आहे. तिनही धर्मांचे हे एक पवित्र तिर्थस्थळ आहे. याच धार्मिक स्थळांचे महत्त्व जोपासण्यासाठी येथील प्रसिद्ध मंदिर व त्यातील मूर्तीची प्रतिकृती दरवर्षी येथील श्री स्वामी भद्रनाग मस्कऱ्या गणेश मंडळातर्फे साकारल्या जात आहे.सतत चवथ्या वर्षी येथील भद्रनाग स्वामी मंदिर परिसरात श्री स्वामी मस्कऱ्या गणेश मंडळातर्फे मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी वरदविनायक मंदिर गवराळा तसेच वरद विनायकाच्या मूर्तीची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली असून ही मूर्ती सध्या भद्रावतीकरांचे आकर्षण ठरत आहे. जुन्या वरद विनायक मंदिरातील दोन बाजुंनी उभे असलेले दोन द्वारपाल, तेथील लहान प्रवेशद्वार, पायऱ्या तसेच वरद विनायक मूर्तीच्या मागील भाग आणि जसाच्या तसा साकारण्यात आला आहे.विशेष म्हणजे ही प्रतिकृती तथा येथील सजावटीसाठी भद्रावतीच्या कलारांनाच संधी देण्यात आली आहे. वरदविनायकाच्या मूर्तीची प्रतिकृती ग्रामोदय संघ भद्रावती येथे कार्यरत तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुकेश वाणी यांनी तयार केली असून उत्कृष्ठ सजावट महेश बोढे व सचिन वासमवार यांनी केली आहे.सर्वांमध्ये सर्व धर्मसमभावाची बिजे रोवली जावी तसेच समाजात एकोपा निर्माण व्हावा या एकमेव उद्देशाने या ठिकाणी श्री स्वामी भद्रनाग मस्कऱ्या गणेश मंडळातर्फे मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात येते. मूर्ती स्थापनेचे हे मंडळाचे चवथे वर्ष आहे. पहिल्या वर्षी चंडीका माता मंदिर, दुसऱ्या वर्षी श्री भद्रनाग स्वामी मंदिर, तिसऱ्या वर्षी भवानी माता मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली होती.वरद विनायकाच्या प्रतिकृती व देखावा पाहण्यासाठी दररोज याठिकाणी शहरी तथा ग्रामीण भागतील भाविकांची रिघ असते. भद्रनाग स्वामी मंदिर परिसरात वरद विनायक अवतरल्याचे स्वरूप या ठिकाणाला प्राप्त झाले असल्याचे भाविक सांगतात. पुढील वर्षी पार्श्वनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा मानस असल्याचे श्री भद्रनाग स्वामी मस्कऱ्या गणेश मंडळाचे मुनाज शेख यांनी सांगितले. या मंडळाचे मुनाज शेख, रोहण खुटेमाटे, योगेश पांडे, निलेश जगताप, सचिन कुटेमाटे, अमोल बडगे, राकेश किनेकर, संदीप लोणारे, नितीन मराळे, धनराज माहुरे, प्रमोद वावरे, दादा केवटे, पंकज चिलके, शुभम नागपूरे, निलेश राऊत, बिपिन देवगडे, चेतन मोहीतकर, सोनु पवार, आशिष दैवलकर, सागर दैवलकर, शुभम शिंदे, निलेश ठाकरे, भूमेश वालदे, शूभम बगडे, मनोज कायरकर, अफजल शेख आदी परिश्रम घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भद्रनाग स्वामी मंदिर परिसरात अवतरले वरदविनायक
By admin | Updated: October 7, 2015 02:08 IST