गोंडपिपरी : विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देणारे शिक्षक चक्क हजेरी रजिस्टरवर उपस्थित असल्याच्या सह्या करून गैरहजर राहत असल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शासन या शिक्षकांच्या पगारावर हजारो रुपये खर्च करते. मात्र गैरहजर राहून पगाराची उचल करण्यात येत असल्याचा प्रकार गोंडपिपरी येथील जि.प. मुलांची प्राथमिक शाळा येथे उघडकीस आला आहे.जि.प. मुलांची प्राथमिक शाळा अनेक वादात सापडली असून आज हा प्रकार पुन्हा नव्याने उघडकीस आल्याने पालकात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याध्यापकांना विश्वासात घेऊन हजेरी रजीस्टरवर उपस्थित असल्याच्या सह्या करून आपआपली कामे आटोपण्यासाठी जात असल्याचा प्रकार मागील अनेक दिवसापासून होत असल्याचा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष राकेश नगारे यांनी केला आहे. काल (दि. ६) राकेश नगारे हे शाळेत गेले असता हा प्रकार उघडकीस आला. भेटी दरम्यान शिक्षकांच्या हजेरी रजिस्टरची चौकशी केली. यावेळी या रजिस्टरवर एकूण नऊ शिक्षकांच्या सह्या ६ मेच्या कॉलममध्ये होत्या. मात्र त्यापैकी सहाच शिक्षक उपस्थित दिसले. याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता संपूर्ण शिक्षक उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संपूर्ण शिक्षकांना राकेश नगारे यांनी कार्यालयात बोलावण्याची विनंती केली असता शिक्षक सुधीर चिंतलवार, विशाल गेडाम, कविता कन्नाके हे गैरहजर होते. यावरुन असे लक्षात येते की, मुख्याध्यापकांना मॅनेज करून हे शिक्षक गैरहजर राहतात. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या सुद्धा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापक राजकरण शेडमाके यांच्या कार्यकाळात सुधीर चिंतलवार यांच्या वर्गातील पाच ते सहा विद्यार्थी शाळेत दप्तर ठेवून शेंगा तोडायला गेले होते. येताना ऑटोला हात दाखवून थांबवले. त्यापैकी एक विद्यार्थीचालत्या ऑटोतून उडी घेतल्याने जागेवर बेशुद्ध झाला. रस्त्यावरुन जाणार्या एका व्यक्तीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तिथे उपचार होऊ न शकल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुधीर चिंतलवार व प्रभारी मुख्याध्यापक शेडमाके यांच्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. मात्र यावेळी सदर विद्यार्थ्यांच्या पालकाला आर्थिक व्यवहार करून प्रकरण निपटारा केल्याचा आरोपही नगारे यांनी केला आहे. गैरहजर शिक्षकांची व मुभा देणार्या मुख्याध्यापकाची वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नगारे यांच्यासह पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
हजेरी रजिस्टरवर सह्या; पण शिक्षकच गायब?
By admin | Updated: May 8, 2014 01:53 IST