मूल : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी नामांकन परत घ्यायच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती मूलचे माजी सभापती गजानन वल्केवार यांनी ग्रामपंचायत राजोली येथील शिवसेना उमेदवार अशोक कावळे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याने शिवसेना पदधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. शिवसेना उमेदवार अशोक कावळे यांनी या संदर्भात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवार पळविण्याचा भाजपचा डाव अखेर फसल्याचे दिसून आले.
येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकासंदर्भात सोमवारी मूल तालुक्यातील ग्रामपंचायत आढावा बैठकीस शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक चालू होती. या बैठकीला शिवसेना मूल तालुकाप्रमुख नितीन येरोजवारसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवार उपस्थित होते. राजोली येथील शिवसेना उमेदवार अशोक कावळे यांना भाजपचे माजी उपसभापती गजानन वल्केवार यांनी खाली बोलवून उमेदवारी मागे घे अशी धमकी दिली. त्यावेळी बैठकीमध्ये ही बाब लक्षात येताच सर्व पदाधिकारी खाली येऊन कावळे यांना भाजप कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडविले. संपर्कप्रमुख प्रशांत कदम व जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी गजानन वल्केवार व भाजपनी सर्व जमाव केलेल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली की शिवसेना हे खपवून घेणार नाही. या संदर्भात शिवसेना उमेदवार अशोक कावळे यांनी मूल पोलीस ठाण्याला गजानन वल्केवार यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.