बल्लारपूर : बल्लारपूर नगर पालिकेने उपयोगिता कराच्या नावाने शहरातील नागरिकांच्या घरावर लावलेला कर तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी उलगुलान संघटनेच्यावतीने नगर पालिकेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नगर पालिका बल्लारपुरातील जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल करीत आहे. यामध्ये पाणी, वीज, वृक्ष, सफाई, शिक्षण, अतिरिक्त समायोजन कर असे विविध कर आकारले आहेत. चालू वित्तीय वर्षांपासून उपयोगिता कराच्या नावाने नगर पालिकेने येथील नागरिकांवर गृहकराच्या रूपात अतिरिक्त भुर्दंड लादलेला आहे. ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्याशी चर्चा केली. उपयोगिता कराच्या नावाने होणारी वसुली थांबवावी. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शिष्टमंडळात उलगुलान संघटनेचे राजू झोडे, वंदना तामगाडगे, भूषण पेटकर, स्नेहल साखरे, अनिरुप पाटील, मनोज बेले, रोशन गुन्नेवार, भगतसिंग झगडा, जाकीर खान, सचिन पावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.