चंद्रपूर : स्थानिक एकोरी वॉर्डातील राजस बौद्ध महिला मंडळाच्यावतीने वॉर्डातील राजस बुद्ध विहारामध्ये जादुटोणा विरोधी कायदा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव यांनी महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जादुटोणा विरोधी कायद्याच्या १२ कलमाबाबत सचित्र पोस्टरच्या साहाय्याने सविस्तर माहिती या कार्यक्रमामध्ये दिली. या कायद्यांतर्गत दोषी आढळून आलेल्या व्यक्तींना सहा ते ते १० वर्षांपर्यंत कारावासाची सजा होऊ शकते, अशी माहिती जाधव यांनी उपस्थिताना दिली. जादुटोणा भूत-भानामती, करणी अंगात येणे यावर आधारित ढोंगी बुवा, बाबा, महाराज मांत्रिक अलौकिक शक्ती भासविणारे चमत्कारिक प्रयोग दाखवून समाजाला कसे लुबाडतात तशाच प्रकारच्या चमत्कारिक प्रयोगाचे सादरीकरण करून त्या प्रयोगामागील वैज्ञानिक कार्यकारणभाव जाधव यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट करून सांगितला. जादुटोणा, भूत-भानामती, करणी, अंगात येणे, मंत्राने विषारी सापाने दंशीत व्यक्तीचे विष उतरविणे, अलौकीक शक्तीद्वारा तथाकथित चमत्कार दाखविणे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, गुप्तधनप्राप्तीसाठी नरबळी देणे, हे सर्व थोतांड आहे. आपल्या स्वार्थासाठी ढोंगी लोकांनी समाजामध्ये पसरविलेल्या अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. विज्ञाननिष्ठ विवेकवादी बनून या कायद्याच्या प्रबोधनाच्या कार्यात सक्रीय सहभागी होऊन सहकार्य करा, असे आवाहन जाधव यांनी याप्रसंगी केले. शारदा गुरनुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत सादर केले. पाण्याने पेटणाऱ्या चमत्कारिक दिव्याचे कातकर यांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रंजना पडवेकर केले. याप्रसंगी अंनिस चळवळीचे कार्यकर्ते अशोक मेश्राम, राजेश पिंजरकर यांनीही मार्गदर्शन केले. भारत रंगारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जादुटोणा विरोधी कायदा प्रबोधन कार्यक्रम
By admin | Updated: June 10, 2014 23:59 IST