भिसी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत नरेंद्र कैकाडू शेंद्रे (वय ४२) या कोरोना योद्ध्याचा चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाशी झुंज देताना उपचारादरम्यान मंगळवारी (दि. २०) मृत्यू झाला.
त्याआधी १७ एप्रिलला दिनेश बिनकर या परिचराचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला होता. तीन दिवसांत दोन्ही परिचरांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता व रुग्णसेवेशी संबंधित सर्व कामे बाधित झाली आहेत. अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही नातेवाईकसुद्धा घाबरत आहेत. स्वतःची मुलेसुद्धा मृतदेहाला हात लावायला तयार नाहीत, अशी स्थिती मंगळवारी भिसी येथे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये निर्माण झाली. अशा बिकट स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर असणे खूप आवश्यक आहे. कोरोना काळात प्रत्येक रुग्णालयात परिचराची भूमिका खूप महत्त्वाची आहे; पण भिसी प्रा. आ. केंद्रात आता एकही परिचर उरला नाही. त्यामुळे भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी अथवा स्थायी तत्त्वावर तत्काळ नवा परिचर देण्याची मागणी येथील वैद्यकीय अधिकारी व इतरही कर्मचाऱ्यांनी केली आहे.