भद्रावतीच्या नगराध्यक्षपदी अनिल धानोरकर यांची फेरनिवडभद्रावती : भद्रावती नगरपरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा विहित कार्यकाळ संपत असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी नामनिर्देशन पत्र १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. यात विद्यमान नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे नगराध्यक्षपदी पुन्हा अविरोध निवडून आले आहेत. येत्या ७ एप्रिलला याबाबतची औपचारिक घोषणा तेवढीच बाकी आहे.पाच वर्षापैकी पहिले अडीच वर्षे अनिल धानोरकर हे नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते. त्यानंतर नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत अनिल धानोरकर पुढील अडीच वर्षासाठी अविरोध निवडून आले.गेल्या चार टर्मपासून शिवसेनेचे भद्रावती नगरपालिकेवर वर्चस्व आहे. सत्तेची हॅट्रीक केल्यानंतरही पुन्हा त्यांच्याचकडे सत्ता येत आहे. ग्रामीण भद्रावतीचा भद्रावती शहरात कायापालट केला, याचा आपणाला अभिमान आहे. भद्रावतीकरांनी दिलेली ही कामाची पावती आहे, असे मत याप्रसंगी नवनिर्वाचीत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.भद्रावती येथे १० कोटींचे भाजीमार्केट, डोलारा तलावाचे सात कोटींचे काम व गवराळा तलावाच्या सौंदयीकरणासाठी पाच कोटी, एक कोटी ९४ लाख किंमतीचा जलतरण तलाव, दोन कोटीचे मच्छी मार्केट (चिकन व मटन मार्केट प्रमाणे) अशी कामे प्रस्तावित आहेत. स्टेडीयम पूर्ण न झाल्यास भद्रावती पालिका स्वत: स्टेडीयम उभारेल, अशी ग्वाही धानोरकर यांनी दिली आहे.तसेच नाट्य सभागृहाचा प्रस्ताव शासनाकडे गेला असून येत्या अडीच वर्षात सदर काम पूर्ण करणार असल्याचे धानोरकर यांनी सांगितले.भद्रावती नगरपालिकेत एकूण २७ सदस्य आहेत. यात शिवसेना- १४, काँग्रेस- २, राष्ट्रवादी काँग्रेस-२, भारतीय कम्युनिस्ट पक्ष- २, बहुजन समाज पक्ष-२, स्वतंत्र भारत पक्ष- १, भारीप बहुजन महासंघ- ३ व अपक्ष- १ असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी लोंढे हे काम पाहत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावतीच्या नगराध्यक्षपदी अनिल धानोरकर यांची फेरनिवड
By admin | Updated: April 4, 2016 02:12 IST