- ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - चहा पत्ती विकणा-या व्यापा-यांकडून वसूल केलेली अडीच लाखांची रक्कम एका नोकराने हडप केली. अनिल दादूजी भगत (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो पारडी, पुनापूर येथे राहतो.
वर्धमान नगर, जुना भंडारा मार्गावरील रहिवासी मनोज ओमकारमल अग्रवाल (वय ४४) हे चहाचे ठोक व्यापारी आहेत. त्यांच्याकडे अनिल भगत नोकर होता. व्यापा-यांना दिलेल्या चहाच्या रक्कमेची वसुली करण्याचे काम त्याच्याकडे होते. अनिलने १ एप्रिल ते २२ ऑगस्ट या कालावधीत विविध व्यापा-याकडून अडीच लाख रुपये गोळा केले. ही रक्कम स्वत: हडप करून अनिलने अग्रवाल यांची फसवणूक केली. ही दगाबाजी लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. लकडगंज पोलिसांनी अनिल भगत विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.