फोटो
राजुरा : जिवती तालुक्यातील पाटण येथे महाराजस्व अभियानांतर्गत आदिवासी वनहक्क कायद्यानुसार आदिवासी समाजातील शेतकर्यांना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शेतजमिनीचे पट्टे, रेशनकार्ड वाटप करण्यात आले तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थींना प्रत्येकी २० हजार याप्रमाणे धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जिवती तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असून, जवळपास १८० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. तालुक्यात सिंचन सोईसाठी शासनाच्या जलसंधारण योजनेंतर्गत लवकरच तीन तलावांची कामे पूर्ण होतील. महसूल विभागामार्फत जमिनीची मोजणी सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम जिवती तालुक्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. अनेकांना जातीचे दाखले मिळू लागले आहेत. तालुक्याला रस्ते व अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ८४ प्रकरणे मार्गी लागले आहेत. शासनाने कृषी विभागांतर्गत विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळून शेतमालाला योग्य दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी राजुरा उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, आदिवासी ज्येष्ठ नेते तथा माजी जि. प. सदस्य भीमराव पाटील मडावी, पं. स. सभापती अंजना पवार, सरपंच सुषमा मडावी, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, सीताराम मडावी, श्यामराव कोटनाके, ताजुद्दीन शेख, भीमराव पवार आदी उपस्थित होते.