लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी व इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने कर्मचारी, अधिकारी यांनी बुधवारी राज्यव्यापी संप पुकारला होता. तो चंद्रपूर जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी झाला. तत्पूर्वी चंद्रपुरात दुपारी १ वाजताच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांचा प्रामुख्याने यात सहभाग होता.अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन महाराष्ट्रराज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सन २००५ नंतर नियुक्ती झालेली कर्मचारी- शिक्षक आग्रही आहेत. परंतु शासन अद्याप सकारात्मक नाही. कंत्राटीकरण रद्द करणे, बक्षी समितीचा खंड- २ प्रकाशित करुन लागू करणे, जानेवारी २०१९ व जुलै २०१९ च्या महागाई भत्त्याची थकबाकी, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांसाठी निधन पावलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे वारसा वणवण फिरत आहेत. पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे या सहजशक्य असलेल्या मागण्यांबाबतसुद्धा दिरंगाईचे धोरण राबविले जात आहे. इतरही राज्य व विभागस्तरीय मागण्यांचा विचार होत नसल्याने राज्यातील कर्मचारी- शिक्षक नाराज आहेत.त्यामुळे बुधवारी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व त्याचे रुपांतर सभेत करुन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे, अध्यक्ष दीपक जेऊरकर, जिल्हा परिषद कर्मचारीस महासंघाचे कार्याध्यक्ष शालिक माऊलीकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्रीहरी शेंडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोक वैद्य, तलाठी संघटनेचे सचिव संपत कन्नाके, जुन्या पेन्शन हस्त संघटनेचे सचिव निलेशकुमरे, महसूल संघटनेचे रमेश चन्ने यांनी मोर्चाच्या अनुषंगाने कर्मचाºयांच्या प्रश्नाबाबत मनोगत व्यक्त केले.या मोर्चाचे संचालन संतोष अतकारे यांनी केले तर आभार रमेश चन्ने यांनी मानले.या संघटना मोर्चात सहभागीया मोर्चात जिल्ह्यातील जवळपास १५ हजार अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. महसूल कर्मचारी संघटना, कोषागार कर्मचारी संघटना, वनविभाग कर्मचारी संघटना, सार्वजनिक बंधकाम विभाग कर्मचारी संघटना, पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटना, सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट - ब राजपत्रीत संघटना, स्थानिक निधी लेखा परिक्षण संघटना, विक्रीकर विभाग कर्मचारी संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, कृषी विभाग कर्मचारी संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, तंत्रशिक्षण कर्मचारी संघटना, पोलीस अधीक्षक कार्यालयीन कर्मचारी संघटना, प्रादेशिक्षक परिवहन कर्मचारी संघटना, मुद्रांक कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, सहकार विभाग कर्मचारी संघटना व राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्यां सर्व कर्मचारी संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता.कामगारांचा असंतोष रस्त्यावरचंद्रपूर : केंद्र शासनाच्या कामगारद्रोही, जनताद्रोही आणि देशद्रोही सरकारला धडा शिकविण्याचा निर्णय देशातील कामगार कर्मचारी संघटनांनी घेतला व बुधवारी देशव्यापी संप पुकारला. या संपाला पाठिंबा देत विविध कामगार संघटनांनीही बुधवारी चंद्रपुरात मोर्चा काढला. गांधी चौक चंद्रपूर येथून कामगार नेते अरुण लाटकर यांचे नेतृत्वात विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो कामगार कर्मचारी, शेतकरी, संघटित कामगार, असंघटित कामगार, बांधकाम कामगार, वन कामगार, मलेरिया फवारणी कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी महिला हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. नोकर भरती वरील बंदी हटवा, वाढत्या महागाईला आळा घाला, किमान वेतन २१००० रुपये द्या, साठ वर्षावरील सर्वांना पेंशन द्या, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, आदी गगणभेटी घोषणा देत मुख्य रस्त्याने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी इंटकचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, राजेश पिंजरकर, वामन बुटले, प्रल्हाद वाघमारे, पुरुषोत्तम आदे, वामन मानकर, देवराव लोहकरे, जगदीश साहू, सुदाम भागडकर, सोमेश्वर ठेंगरी, विठ्ठल पवार, भानुदास चव्हाण, आदी उपस्थित होते.एफडीआयच्या गैरवापराविरोधात आंदोलनचंद्रपूर: ऑनलाईन व्यापार आणि ऑनलाईन शॉपिंग अॅप संचालक कंपन्याकडून भारतीय चिल्लर बाजाराला मोठे नुकसान पोहचत आहे. या कंपन्या भारत सरकार आणि सामान्य ग्राहकांकडून लूटमार करत आहेत. त्यामुळे छोटे व्यापारी व चिल्लर व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत असून या कंपन्या एफडीआयमधून आपला तोटा दाखवत सेल आऊट करवून घेत आहेत. याचा निषेध करण्यासाठी चंद्रपुरात दुकाने बंद ठेवून एफडीआयच्या गैरवापराचा विरोध करण्यात आला. रिटेल मार्केटला नामशेष करण्याचे षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. या संकल्पावर ठाम राहून तीन दिवसांचे राष्ट्रीयअधिवेशन रामलिला मैदानात होत आहे. यात देशभरातील सुमारे १५०० मोबाईल व्यापारी सहभागी झाले आहेत. यात चंद्रपूरच्याही व्यापाऱ्यांचा समावेश असून चंद्रपुरातही या धोरणाचा तीव्र विरोध करण्यात आला. येथील सर्व मोबाईल शॉपींनी आपली दुकाने बुधवारी बंद ठेवली. या आंदोलनात चंद्रपूर मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अभयसिंह कछवाह, सचिव जयपाल डोडानी, उपाध्यक्ष निरज शर्मा, उपाध्यक्ष गुरफान सिध्दिकी, जितू बोधवानी, गौरव गांधी, पंकज शर्मा, माधव डोडानी आदी सहभागी झाले.वेकोलि कामगाराचाही संपराजुरा : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण राबवत असून कामगार कायदे बदलून नविन चार कोडमध्ये परिवर्तन, खासगीकरण व आऊटसोर्सींग, वाढती बेरोजगारी, ठेकेदारी प्रथा यासह अनेक बाबतीत कामगारांवर अन्याय केला जात आहे. याच्या निषेधार्थ व आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपुर क्षेत्रीय वेकोलिच्या कोळसा खाणीत कामगारांनी बुधवारी संप पुकारला. बल्लारपूर क्षेत्रात सकाळ व दुपारच्या पाळीत इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या चार कामगार संघटनेचे कार्यकर्ते व सदस्य मोठया संख्येने संपात सहभागी झाले. मात्र भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे सदस्य कामावर हजर झाले. बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती एक्सपान्शन, गोवरी, पोवनी, गोवरी डीप, बल्लारपूर या ओपनकास्ट व सास्ती, बल्लारपूर भूमिगत तसेच क्षेत्रीय कार्यालय या सर्व कार्यालय आणि माईन्समध्ये फार कमी उपस्थिती होती. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के, इंटकचे क्षेत्रीय अध्यक्ष आर. शंकरदास, सुदर्शन डोहे, मधुकर ठाकरे, रायलिंगू झुपाका, दिलीप कनकूलवार आदींनी केले.
जिल्ह्यातील सर्व कर्मचारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा, ...
ठळक मुद्देप्रलंबित मागण्या पूर्ण करा : आंदोलनांनी दुमदुमले चंद्रपूर