काँग्रेसची स्पष्टोक्ती : सर्व कार्यकर्ते सोबतचिमूर : १ नोव्हेंबर रोजी चिमूर नगर परिषदेची निवडणूक होवू घातली असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व समावेशक व सर्वच जातीच्या उमेदवाराला संधी दिल्याचे माजी आमदार अविनाश वारजूरकर यांनी स्पष्ट केले.चिमूरची क्रांतीभूमी म्हणून ओळख आहे. या क्रांती नगरीत निवडणूक आली की वातावरण चांगलच तापते. सर्वच प्रकारचे लोक निवडणुकीत नशिब आजमाविण्याचा प्रयत्नात असतात. पक्षाशी संबंधित असलेला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून तिकीट मिळविण्याचे प्रयत्न करतो. पण तिकीट वाटप करताना प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तोच अनुभव या निवडणुकीतसुद्धा आला. तिकीट वाटपासाठी एका समितीचे गठण करण्यात आले होते. कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षच या कमेटीचे अध्यक्ष होते. तिकीट वाटप करताना सर्वसमावेशक धोरण राबविण्यात आले. कॉंग्रेसतर्फे पिरिपाला दोन, अल्पसंख्याकाला एक तिकीट देण्यात आली. या धोरणामुळे कुणीही नाराज झाले नसून सर्व कार्यकर्ते काँग्रेससोबत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षच तिकीट वाटप करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी आपल्यासह आ.विजय वडेट्टीवार व इतर प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच चिमूरच्या प्रश्नांची सखोल जाण असणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिले. असे वारजूरकर म्हणाले. यात सर्वच जातीच्या उमेदवारांंना व जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे ते म्हणाले. यातून एक चांगला निकाल कॉंग्रेसच्या हाती येईल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)
तिकीट वाटपात सर्व समावेशक धोरण
By admin | Updated: October 11, 2015 02:15 IST