पोलिसांचा तस्करीवर डोळा : यवतमाळ जिल्ह्यातून होतोयं पुरवठाचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील दारू दुकान व बार-रेस्टॉरंट चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. दारूबंदीनंतर वणीकडून चंद्रपूरकडे येणाऱ्या मार्गावरील पोलीस चौक्या हटल्याने आता दारू तस्करीला रान मोकळे झाले आहे. दररोज दारू नेणारे एखादे तरी वाहन पोलिसांच्या हाती लागत आहे. पोलिसांचा डोळा चुकवून अनेक वाहने मात्र दारूचा पुरवठा करीत आहेत.एक एप्रिलपासून चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या यादीत आला. त्यामुळे जिल्ह्यातील शौकिनांना आता आपले कसे होईल, असा प्रश्न पडला होता. दारूबंदी होताच, पोलीस प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर पाटाळा, घुग्गुस व बोरी येथे पोलीस चौक्या लावल्या. वणीकडून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात होता. दुचाकीसह महामंडळाच्या बसमधील प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी केली जात होती. त्यामुळे दारू तस्करीला चांगलाच लगाम लागला होता.दारूबंदी झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील व्यसनाधीन व शौकिनांना चिंता भेडसावू लागली होती. मात्र त्यांची ही चिंता फार काळ टिकली नाही. दारुबंदीनंतर काही दिवसांतच दारू तस्करांनी डोके वर काढले. सीमेवरील पोलीस चौक्या प्रशासनाने हटविल्या. त्यामुळे दारू तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. असे असले तरी या दारू तस्करांवर पोलीस पाळत ठेऊन आहेत. पांढरकवडा, मारेगाव, झरी, वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्या मागार्ने येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील दारू दुकानदार व बार अँन्ड रेस्टॉरंटमध्ये आता ग्राहक करण्यापेक्षा दारू तस्करी करणे अधिक फायदेशिर ठरत आहे. त्यामुळे या ग्राहकांपेक्षा तस्करीकडे त्यांचे अधिक लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून पांढरकवडा, मारेगाव, झरी व वणी तालुक्यातील देशी-विदेशी दारू दुकानांचा तसेच वाईन व बिअरचा खप लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात वणीत येत असल्याने वणीतील दारू दुकानांतील खपही वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र या खपापेक्षाही तस्करीमुळे दारूची गंगा चंद्रपूर जिल्ह्यात वाहत असल्याने विक्रीचा उच्चांक वाढला होत आहे. (प्रतिनिधी)
दारू तस्करीला मोकळे रान
By admin | Updated: December 3, 2015 01:26 IST