विमानतळ नव्हे, हे तर बल्लारपूरचे बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:24 PM2019-03-05T22:24:20+5:302019-03-05T22:24:41+5:30
बल्लारपूर या औद्योगिक व ऐतिहासिक शहरात नव्याने बनलेले अवाढव्य आणि तेवढेच सुशोभित बसस्थानक केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील स्पर्श बसस्थानक (टच बस स्टॅन्ड) म्हणून ते एकमेव असावे! स्पर्श बस स्थानक म्हणजे, बस प्रवाशांना घेऊन येणे, उतरविणे, नवीन प्रवासी घेणे आणि लगेचच तेथून पुढच्या मार्गावर रवाना होणे.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर या औद्योगिक व ऐतिहासिक शहरात नव्याने बनलेले अवाढव्य आणि तेवढेच सुशोभित बसस्थानक केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील स्पर्श बसस्थानक (टच बस स्टॅन्ड) म्हणून ते एकमेव असावे! स्पर्श बस स्थानक म्हणजे, बस प्रवाशांना घेऊन येणे, उतरविणे, नवीन प्रवासी घेणे आणि लगेचच तेथून पुढच्या मार्गावर रवाना होणे. या बसस्थानकाचे देखणे रूप पाहून हे एखादे विमानतळच असावे असे वाटले नाही तर नवलच. बल्लारपूरकरांनी कधी कल्पना केली नाही, असे भव्य व नेत्रदीपक बसस्थानक आकाराला आले असून त्याचे लोकार्पण बुधवारी होणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरचे बसस्थानक भव्य आणि अत्याधुनिक व ‘बस देखते रह जायेंगे’, असे सुशोभित असणार असा संकल्प केला व तो तडीस नेला आहे. या विशाल बसस्थानकावर प्रवाशांकरिता सुविधाही तेवढ्याच अत्याधुनिक आहेत. या बसस्थानकाचे एकूण क्षेत्रफळ १२० मीटर असून त्यातील इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ६८ मीटर बॉय ६८ मीटर एवढे भव्य आहे. या बसस्थानकात महिला व पुरुष प्रवाशांकरिता वेगवेगळे प्रतीक्षालय आहेत. सर्वत्र पंख्यांची व विद्युत प्रकाशाची व्यवस्था आहे. मुळात स्थानकाचे आत हवा खेळती राहावी, अशी बांधणी करण्यात आली आहे. तद्वतच, आतील गरम हवा बाहेर जाऊन प्रसन्न, पर्यावरण पोषक वातावरण स्थानक परिसरात राहावे, याची काळजी बांधकाम करताना घेण्यात आली आहे. तीन सिटरच्या एकूण ११० खुर्च्या प्रवाशांच्या बसण्याकरिता ठेवल्या आहेत. बसेस थांबण्याकरिता एकूण १२ फलाट असून २४ बसेस थांबण्याची व्यवस्था असल्याचे रापमचे विभाग नियंत्रक डी.सी. पाटील यांनी सांगितले. बसेस येण्या-जाण्याची वेळ सांगण्याकरिता ध्वनीयोजना आहे. कॅन्टीन, फळ, बुकस्टाल व जनरल स्टोर्सकरिता गाळे बांधले असून, स्थानकातच एटीएमची व्यवस्था आहे. एकूण शौचालय १५ असून महिला, पुरुष व अपंग यांच्याकरिता भारतीय बैठकीचे व विदेशी बैठकीची प्रत्येकी तीन व चार अशी संख्या आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीकरिता शुद्ध व थंड पाणी देणारे मोठ्या क्षमतेचे आॅरो यंत्र लावण्यात आले आहेत. स्थानकाच्या आवारातच दुचाकी, चार चाकी व आॅटो पार्किंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. प्रवाशांना फ्रेश होण्याकरिता बाथरुमही आहेत. यासोबतच नयनरम्यता म्हणून बसस्थानकाची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करण्यात आली आहे. भिंतीवर आधुनिक पद्धतीने वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. यात भडक रंगाचा वापर टाळून सौम्य व आकर्षक रंग वापरण्यात आले आहेत, हे विशेष! प्रवेशद्वारावर वेळ दर्शविणाऱ्या घडीचा सुमारे ७० फूट उंच असा देखणा मनोरा उभा करण्यात आला असून तीन दिशांनी घड्या लावल्या आहेत. बसेसना जाण्या-येण्याकरिता दोन मोठे प्रवेशद्वार असून पायदळ प्रवाशांना येण्याजाण्याची, तद्वतच आॅटोकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानकाच्या आवाराच्या सीमा हिरवळीने सजविण्यात आल्या आहेत एकंदरीत, बसस्थानकात प्रवेश करताच, प्रवाशी प्रसन्न व्हावेत! या साऱ्या सुख - सुविधांची निगा राखण्याकरिता आवश्यक तेवढ्या संख्येत सुरक्षा रक्षक राहणार आहेत. इमारतीचे आर्कीटेक्चर रवी सोनकुसरे असून बांधकाम राहुल मोडक व एस.डी. क्षीरसागर यांच्या देखरेखेत व इमारत निरीक्षक पी.एच. अंबादे यांच्या मार्गदर्शनात झाले आहे.
परिसरातील झाडांचाही बांधकामात वापर
या बसस्थानकाच्या जागेवर मोठ्या आकाराचे पिंपळाचे दोन वृक्ष होते. त्यांचे वय निदान दीडशे वर्षे असणारच! नवीन इमारतीकरिता त्या वृक्षांना तोडण्यात आले. पण, मुळासकट नव्हे! जमिनीवरील सुमारे चार फूट भाग तसाच कायम ठेवून त्याभोवती चबुतरे बांधून बुंध्याला रंगरंगोटीने सजवून, त्याला आकर्षक करण्यात आले आहे. या वृक्ष बुंध्यामुळे स्थानकाच्या आकर्षणात भर पडली आहे.