बल्लारपुरात शेतकरी दिन : हरीश गेडाम यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : कृषी क्षेत्रात सहकार शेतीचा पाया डॉ. विठ्ठलराव विखे यांनी रचला. शेतकरी देशाचा आधारस्तंभ करण्याची त्यांची तळमळ होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. हरीश गेडाम यांनी शनिवारी शेतकरी दिन कार्यक्रमात केले.बल्लारपूर तालुका कृषी विभागाच्यावतीने डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समिती सभागृहात शेतकरी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून अॅड. गेडाम बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. हरीश गेडाम, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, नायब तहसीलदार पी.डी. वंजारी, कृषी मंडळ अधिकारी एम.एस. वरभे, कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे, कृषी सहायक प्रशांत गजभिये यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ठरते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांनी झटले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध व सुखी करण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्याची गरज आहे. शेती क्षेत्रात नियोजन करून उत्पादन घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन प्रशांत गजभिये यांनी तर आभार सुधाकर खांडरे यांनी मानले. याप्रसंगी तालुका कृषी विभागाचे ए.आर. फटिंग, एम.बी. दानव, सी.एम. निब्रड, अश्विनी कुळकर्णी, मनीषा भांडारकर, बी.एस. धवने, एस.जी. बावणे यांच्यासह शेतकरी बांधवाची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करावा
By admin | Updated: August 30, 2015 00:47 IST