ब्रह्मपुरी : पद्मापूर, हळदा परिसरातील वाघिणीला जेरबंद करण्यासाठी २८ जूनला हैदराबाद येथील नवाब शाफत अली खान यांना पाचारण करण्यात आले. १० जुलैला नवाबांनी वाघिणीला पिंजऱ्यात बेशुद्ध करुन जेरबंद केले. नवाबांशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता वयाच्या ५९ वर्षीय नवाबांचा उत्साह व चपळता युवकांनाही लाजविणारी असल्याचे दिसून आले. नवाब हे मूळचे हैदराबाद येथील रहिवासी असून भारत सरकारने पाच राज्यांचा मॅन अॅनिमल कॉन्फ्रीक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यात बिहार, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आदींचा समावेश आहे. २०१६ ला चंद्रपूरच्या वनविभागात एकदा चिचपल्ली, दोनदा चंद्रपूर, एकदा ब्रह्मपुरी येथे प्राण्याविषयीची ट्रेनिंगसुद्धा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’शी बोलताना नवाब म्हणाले, उत्तरप्रदेशात २००९ मध्ये १० लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला शूट केले. २०१३ मध्ये हिमाचल प्रदेशात दोन बिबट्यांना शूट केले होते. तर २०१६ ला झारखंडमधून बिहारमध्ये येत पूर्णिमा जिल्ह्यात पाच लोकांचा बळी घेतलेल्या हत्तीलाही शासकीय आदेशानंतर आपण शूट केल्याचेही त्यांनी सांगितले. अजूनही नवाब रोज १० किमी पायी जंगलात चालत असतात व दोन तास घोड्याची स्वारी करणे हा त्यांचा छंद आहे. ‘मिशन टायगर हळदा’ याविषयी बोलताना नवाब म्हणाले, वाघिणीने गाय मारली होती. ती गाय घेऊन वाघीण चालू लागली. आम्ही सर्व जवळपास दबा धरुन सज्ज होतो. माझ्यासोबत रेंजर रंजन काटकर व महाराष्ट्र वन्यजीव प्राणीतज्ज्ञ डॉ. कादू आदीनी दोन सेकंदामध्ये ती नरभक्षक वाघीण (सी-१) असल्याचे निश्चित केले व वाघिणीच्या मानेवर डाट मारुन १०० मीटर आत बेशुद्ध करुन पिंजऱ्यात टाकण्यात आले. ब्रह्मपुरी जंगलात स्थिती गंभीर असल्याचेही ते म्हणाले. या जंगलात ४० वाघ व १९ बछडे आहेत. या जंगलाला सुमारे ३० गावे लागून आहेत. तेव्हा हा प्रकार पुन्हा होऊ नये, मानव-वन्यप्राणी संघर्ष उदभवू नये, यासाठी वनविभागाने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
वय ५९; परंतु उत्साह तरुणाला लाजविणारा
By admin | Updated: July 12, 2017 00:41 IST