लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या सारीपाटात कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती करेल, हे सांगणे कठीण झाले होते. तसेच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबतही म्हणता येईल. आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर लगेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणाऱ्या जोरगेवारांनी आता महाविकास आघाडीचे सरकार बसताच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. काही दिवसातच भाजपशी जोडलेले ऋणानुबंध त्यांनी संपुष्टात आणले आहे.किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम भाजपमध्ये राहून आपले सामाजिक कार्य सुरू केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते आमदारीची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसची तिकीट मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशही केला. मात्र पक्षाने एबी फार्म महेश मेंढे यांना दिला. त्यानंतर अपक्ष म्हणून किशोर जोरगेवार रिंगणात उतरले. ते प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी झाले. त्यांच्या प्रचारात कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाल्याचे मतदारांनी बघितले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणून आलेले आमदार जोरगेवार सत्तास्थापनेच्या खेळात कुणाला पाठिंबा देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतदारांचा कौल युतीच्या बाजुने असल्याने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जोरगेवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना चांगलाच धक्का बसला. सत्तास्थापनेदरम्यान नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. दरम्यान, २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या सहा अपक्ष आमदारांना मुंबईतील वसईमध्ये एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात आले. त्यात जोरगेवार यांचाही समावेश होता. परंतु बहुमताच्या चाचणी आधीच फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. भाजपची सरकार येणार नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार हे अस्वस्थ होते. अशातच महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपशी जोडलेले ऋणानुबंध संपुष्टात आणत पुन्हा शिवसेनेला पाठिंबा दिला. शनिवारी बहुमत सिध्द होत असताना आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. चंद्रपूरच्या विकासासाठी आपण सत्तेच्या बाजूने मतदान केल्याचे आमदार जोरगेवार यांचे म्हणणे आहे.निकालानंतरच शिवसेनेने दिले होते आमंत्रणचंद्रपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून किशोर जोरगेवार हे प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून आले. निकालानंतर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे चंद्रपूरला आले होते. त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र तेव्हा आमदार जोरगेवार यांनी आपण कुणालाही पाठिंबा देण्याबाबत विचार केला नसल्याचे म्हटले होते.
जोरगेवार पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST
किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम भाजपमध्ये राहून आपले सामाजिक कार्य सुरू केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते आमदारीची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसची तिकीट मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशही केला.
जोरगेवार पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत
ठळक मुद्देभाजपशी ऋणानुबंध तोडले। सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेनेला पाठिंबा