चंद्रपूर : कर्ज काढून आॅटोरिक्षा विकत घेऊन व्यवसाय करत आपल्या तुटपूंज्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या आॅटोरिक्षा चालकांच्या फाटक्या खिशाला विविध करांच्या माध्यमातून राज्य सरकार हात घालत असताना या करांच्या ओझ्यातून आॅटोरिक्षा चालकांना मुक्त करण्यासाठी मी विधानसभेच्या माध्यमातून यशस्वी संघर्ष केला. आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला, त्यातील काही मागण्या पूर्णत्वाससुद्धा आल्यात. आॅटोरिक्षा चालकांनी माझ्यावर व भारतीय जनता पार्टीवर नेहमीच भरभरुन प्रेम केले आहे. आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी यापुढील काळातही आपण संघर्ष करू, असे ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपा- रिपाइं(आ.)- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात भाजपा व मित्रपक्ष युतीचे सरकार स्थापन झाल्यास आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी विकास महामंडळ स्थापन करु, अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. संत तुकाराम महाराज सभागृह बल्लारपूर येथे आॅटोरिक्षा चालकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या संमेलनाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, महाराष्ट्र आॅटो चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, भाजपाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष राजीव गोलीवार, भाजपा नेते सतविंदरसिंग दारी, आॅटोरिक्षा चालक संघटनेचे मिलींद निषाद, सुरेश खोब्रागडे, आदींची उपस्थिती होती. यावेळी आॅटोरिक्षा चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी सुधीर मुनगंटीवारांनी वेळोवेळी संघर्ष केला, क्षणोक्षणी साथ दिली. आॅटोरिक्षा चालक- मालक संघटना नेहमीच भारतीय जनता पार्टीसोबत उभी राहिली व भविष्यातही राहील. संमेलनाचे संचालन मनिष पांडे यांनी केले. या संमेलनाला विनोद गहलोत, विकास उमरे, सुरेश सातपुते, सुभाष टोंगे, गुलाब पाटील, गौतम सोगे, बाळू झाडे, अशोक चांभारे, किशोर वाटेकर, राकेश आंबेटकर, कालीदास इटनकर, प्रसाद पुली, सुधाकर आडीलवार, नईम अली, हरिदास वडस्कर, विशाल शेंडे आदींसह बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर या तालुक्यातील आॅटोरिक्षा चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपुरात आॅटोरिक्षा चालकांचे संमेलन
By admin | Updated: October 1, 2014 23:21 IST