या संदर्भात माहिती देण्यासाठी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळण्याच्या संदर्भात प्रशासनाने घेतलेली भूमिका दिशाभूल करणारी आहे. या स्मशानभूमीवर मंगळवारी प्रेत जाळण्याच्या पूर्वी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. एकीकडे कार्यकर्ते, नागरिक यांना बैठकीत गुंतवून ठेवून जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या बंदोबस्तात आणि दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून पे्रत जाळण्याची प्रक्रिया पार पाडली. प्रशासनाची आणि पोलिसांची ही कृती दिशाभूल करणारी असून जनतेच्या धार्मिक भावना पायदळी तुडविणारी आहे, असे ते म्हणाले.पुगलिया पुढे म्हणाले, १९९९ च्या काळात इरई नदीच्या पात्रात प्रेत जाळण्याची प्रथा होती. पर्यावरणाला धोका असल्याने आपण आपल्या खासदार फंडातून ही स्मशानभूमी बांधली. महसूल विभागाने ३० आर जागा दिली, त्यावर तीन शेड बांधण्यात आले. आमदार फंडातून भींतही बांधण्यात आली. ही स्मशानभूमी दाताळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. मात्र पाणी आणि वीज बिलाचा खर्च परवडत नसल्याने ग्रामपंचायतीने नकार दिला. त्यामुळे अडवानी, हसानी यांना देखभाल दुरूस्तीच्या खर्चासह ती चालविण्यास दिली. नंतरच्या काळात लाकडाचे कोठार बांधण्यात आले. मात्र कालांतराने ही स्मशानभूमी बंद पडली. त्यात झुडूपे वाढली. दाताळाच्या नागरिकांनीही येथे वापर बंद केला. नंतरच्या काळात या परिसरात अन्य मंदीरासह बालाजींचे मंदीर बांधकाम सुरू झाले. तेव्हापासून सर्व नागरिकांनी मोक्षधामवर प्रेत जाळणे सुरू केले. ग्रामपंचायतीने ही जागा बालोद्यानसाठी देण्याचा ठराव घेवून प्रशासनाला पाठविला. स्मशानभूमीला कुलूप लावून बंदचा फलकही लावण्यात आला होता. असे असतानाही केवळ एकाच कुटूंबाने आपल्या घरातील व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीचा वापर सुरू केला. मंगळवारची घटनाही त्यातूनच घडली आहे. नगरसेवक डोडाणी यांच्यामागे राजकीय पाठबळ असल्यानेच हा प्रकार जाणीवपूर्वक घडला, मात्र त्यातून नागरिकांच्या भावना दुखविण्यात आल्याचे पुगलिया म्हणाले. ही स्मशानभूमी कुण्या एका समाजाला कधीच नव्हती, जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या मागे फिरण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासावी, आही टोला पुगलियांनी लगावला. पत्रकार परिषदेला राहूल पुगलिया, अॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, प्रशांत दानव, वसंत मांढरे, गावंडे गुरूजी, माजी नगराध्यक्ष डॉ. महाकूलकर आदी उपस्थित होते.
प्रशासनाने दिशाभूल केली - नरेश पुगलिया
By admin | Updated: February 4, 2016 00:59 IST