चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील एकता बचत गटाच्या महिलांना शासकीय योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एकूण नऊ महिलांनी सय्यद आबीद अली यांच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मौजा नांदा येथील महिलांनी १७ जुलै २००२ रोजी एकता महिला बचत गट नांदा या नावाने बचत गट स्थापन केला. आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील महिलांचा बचत गट असल्याने शासकीय योजनेतून बचत गटाला झेरॉक्स मशीन व एस.टी.डी., पी.सी.ओ. करिता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. मात्र हा व्यवसाय चालला नाही. त्यानंतर सय्यद आबीद अली यांनी गटातील महिलांशी चर्चा केली व कोरपना व्यवसाय टाकून होणाऱ्या कमाईतून बचत गटाच्या कर्जाची परतफेड बँकेला करतो, असे सांगत सर्व साहित्य नेल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. मात्र त्यांनी कर्ज परतफेड केली नाही. बँकेकडून गटाला वारंवार पैसे भरा असे सांगण्यात आल्याने बचत गटातील महिला त्रस्त झाल्या आहेत. बचतगटातील एखाद्या महिलेने मानसिक तणावाखाली स्वत:चे जीवन संपविल्यास यासाठी सय्यद आबीद अली जबाबदार राहतील, असे बचत गटाच्या सचिव ज्योती गजानन उईके, मुन्नी खलील शेख, पुष्पा नथ्थू मडावी, दुर्गा मारोती उईके, पंचफुला वासुदेव मडावी, सीताबाई रामा उदे, पार्वता कर्णु पेंदोर, मंदा नामदेव तोडासे, ललिता मारुती पेंदोर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कोट
आदिवासी महिलांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. प्रकरण चौकशीत ठेवले असून संपूर्ण प्रकरणाची तपासणी झाल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल.
- गोपाल भारती ठाणेदार, पो.स्टे., गडचांदूर.
२५ नोव्हेंबर २०२० रोजी १ लाख ६३ हजार ३४३ रुपये व्याजासह भरण्याची नोटीस बॅंकेने आमच्या बचत गटाला पाठविली. बँकेची नोटीस आल्याने आम्ही २१ डिसेंबर २०२० रोजी कोरपना येथे आबीद अली यांचे घर गाठले. त्या वेळेस सय्यद आबिद अली घरी नव्हते. फोनवर बोलून त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. येतो म्हणून सांगितल्यानंतरही घरी आले नाही आणि फोन बंद केला.
- ज्योती उईके, सचिव एकता महिला बचत गट, नांदा