भद्रावती : येथील पार्श्वनाथ मंदिरमध्ये कार्यरत ८२ कर्मचारी आपल्या आपल्या विविध मागण्यांसाठी २७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर बसले आहे. २६ फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. परंतु मंदिर व्यवस्थापनासोबत कुठल्याही प्रकारे चर्चा न झाल्याने शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत सुरू केला आहे.दि. कमर्शियल अॅन्ड इंडस्ट्रीयल लेबर युनियन भद्रावती (संलग्नीत भारतीय मजदूर संघ) तर्फे संबंधित मागण्यांचे निवेदन मंदिर व्यवस्थापनाला देण्यात आले होते. त्यात सर्व कामगारांना दरवर्षी प्रमाणे वेतनवाढ कमीत कमी २००० रुपये देण्यात यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमीत कमी ६० रुपये मजुरी वाढ मिळण्यात यावी, सर्व वाऊचर आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थाई करण्यात यावे, ग्रुप इंन्शुरन्स १ जानेवारीपासुन लागु करण्यात यावा, सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लीप देण्यात यावी व बँकेतुन पगार करण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांना पी. एफ. कपात करण्यात यावी, मंदिराद्वारे दिलेल्या आवासात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे त्वरीत निवारण करण्यात यावे या बाबींवर विचार करण्याच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते. मंदिरात कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा २०१४ मध्ये झालेला करार ३१ डिसेंबर २०१४ ला संपलेला आहे. नविन करार जाने २०१५ पासून लागू करण्याकरीता संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाला २ पत्र देण्यात आली आहे. परंतु व्यवस्थापनाकडून याबाबत दखल घेण्यात आलेली नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांना तोंडी आदेशान्वये सेवा खंडित करणे, कामावरून कमी करण्याबाबत सांगणे असे प्रकार घडत आहे, असेही निवेदनात नमुद केले आहे. व्यवस्थापनातर्फे सदर मागण्या त्वरीत मंजूर कराव्यात, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ना. सुधिर मुनगंटीवार व आमदार बाळू धानोरकर यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी भा.म.स. चंद्रपूरचे संघटनमंत्री मनोहर साळवे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर आवारी, सचिव संदिप घोटेकर, सहसचिव कवडू नरूले, लाला मिश्रा, विजय क्षिरसागर, विलास घोटेकर, पुंडलिक चवरडोल, रामदिन यादव, वैशाली डांगे, ज्योती रणदिवे, शिला रोकडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पार्श्वनाथ मंदिरामध्ये कार्यरत ८२ कर्मचारी बेमुदत संपावर
By admin | Updated: February 28, 2015 01:23 IST