कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. या ग्रामपंचायतींतर्गत आसन खुर्द आणि बोरी नवेगाव ही गावे प्रभाग १ मध्ये येतात. निवडणुकीच्या दिवशी गावातील नागरिक निवडणूक केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले. मात्र, यातील ६० जणांची नावेच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात ग्रामस्थांनी मतदार केंद्रातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदान करता येत नसल्याचे सांगून ते मोकळे झाले. विशेष म्हणजे, ऑनलाइन मतदार यादीमध्ये या मतदारांची नावे असतानाही त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यातील बहुतांश मतदार हे जुनेच असल्यामुळे नेहमीप्रमाणे आपले नाव असेल या भ्रमामध्ये ते होते. मात्र, निवडणूक विभागाने केंद्रामध्ये पाठविलेल्या यादीतील एक पान नसल्याने या पानावर नोंद असलेल्या सर्व मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
या गोंधळासंदर्भात कोरपना येथील तहसीलदारांकडे काही नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या. मात्र, यादीमध्ये असेल्यांनाच मतदान करता येईल, असे सांगून ते मोकळे झाले. एवढेच नाही तर न्यायालयात जाऊन न्याय मागा, असे सांगायलाही ते विसरले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, वंचित मतदारांनी जिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, न्याय देण्याची मागणी केली आहे.
---
संबंधितांवर कारवाई करून न्याय द्यावा
मतदानापासून वंचित ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करून या गावातील नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागले आहे.