मंगेश भांडेकर चंद्रपूरमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांना १ एप्रिलपासून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. रोहयोच्या कामावर राबणाऱ्या मजुरांची मजुरी केवळ राष्ट्रीयकृत बँकेत जमा होत असून बँक खात्याशी आधार कार्ड लिंकींग करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र अनेक मजुरांकडे आधार कार्ड नाही, तर लिंकींगसाठी आधार कार्डवरील व बँक खात्यावरील नाव यामध्ये फरक अशा अडचणींमुळे तब्बल ५६ हजार मजुरांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंकींग झालेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात जॉब कार्ड असलेले २ लाख १४ हजार ४१५ रोहयो मजुर आहेत. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४५२ मजुरांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी लिंकींग झाले आहे. मात्र यातही ५१ हजार ७८ मजुरांचे आधार कार्ड नावाच्या त्रुटींमुळे व्हेरीफाय झालेले नाही. बँक खात्याशी आधार कार्ड लिंकींग करून बँकेमार्फत मजुरी देण्याचे शासनाने धोरण आखले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक तथा स्थानिक पोस्ट कार्यालयातील खातेही यापुढे चालणार नाही, असा आदेशही शासनाने काढला. त्यामुळे मजुरांना आधार कार्ड सक्तीचे झाले. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामाचा समावेश होतो. या योजनेत १२० दिवस कामे उपलब्ध करुन देण्याचा नियम असून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन दिलेच पाहिजे, असा कायदा आहे. आदिवासी बहुल गावात १५० दिवस कामे दिली पाहिजे, असेही शासनाचे धोरण आहे. मात्र १ एप्रिलपासून या मजुरांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने आधार कार्ड नसेल तर मस्टर तयार होणार नाही, याची धास्ती मजुरांनी घेतली आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेर्तंगत प्रत्येक नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ८४ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र, जे २६ टक्के नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत, ते नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामावर असणारे बहुतेक मजुर आहेत. तर आधार कार्ड काढुनही अनेकांना आधार कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रोहयोच्या कामावर आधार कार्ड विना जायचे कसे, हा पेच मजुरांसमोर निर्माण झाला आहे. मजुरीसाठी राष्ट्रीयकृत बँकेची अट घालण्यात आल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे. पोस्ट आॅफिसच्या शाखेतील खातेही आता यापुढे चालणार नाही, असा आदेश शासनाने काढला आहे. त्यामुळे मजुरांना नव्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून मजुर आधार कार्डसाठी तर कर्मचारी आधार लिंकींसाठी धावपळ करीत आहेत. ५१ हजार मजुरांच्या नावात अडचणीचंद्रपूर जिल्ह्यात जॉब कार्ड असलेले २ लाख १४ हजार ४१५ रोहयो मजुर आहेत. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४५२ मजुरांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी लिंकींग झाले आहे. मात्र यातही ५१ हजार ७८ मजुरांचे आधार कार्ड नावाच्या त्रुटींमुळे व्हेरीफाय झालेले नाही. आधार लिंकींग करताना नावात फरक, आधार कार्ड नाही अशा अडचणी येत आहेत.राष्ट्रीयकृत बँकेत खाते गरजेचे रोजगार हमी योजनेची कामे आॅनलाईन झाली असून मजुरांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्थानिक बँक तथा पोस्ट आॅफिस आॅनलाईन नाही. त्यामुळे रोहयोच्या मजुरांना यापुढे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे. आधारकार्डसाठी धावपळग्रामीण भागात आधार कार्ड तयार करण्याकरिता गावात संबंधित एजन्सी पाठवून केंद्र सुरू करण्यात आले. अनेकांनी आधार कार्ड काढले, परंतु अनेक मजुरांना आधार कार्ड प्राप्त झाले नाही. संपर्क साधले असताल स्लिप घेऊन या नाही तर नवीन आधार कार्ड काढा, असेही सांगितले जात आहे.
५६ हजार मजूर ‘निराधार’
By admin | Updated: May 13, 2015 00:02 IST