चंद्रपूर: दुकान बंद करून घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळील पाच लाख रुपयांची रक्कम लुटारूंनी पळविली. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास स्थानिक गोपालपुरी श्री टॉकीज परिसरात घडली. या घटनेने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवर नाकाबंदी करून काही संशयित युवकांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली जात आहे. येथील श्री टॉकीज परिसरातील मुस्तफा मार्केटींग प्रा.लि.चे संचालक शब्बीर लक्कडशाह व मुर्तुजा लक्कडशाह सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून दुचाकीने घराकडे निघाले. दरम्यान, ते अॅड.मोगरे यांच्या घरासमोर पोहचताच, एका युवकाने मिरची पावडर मिसळलेले पाणी त्यांच्या डोळ्यावर फेकले. ते पाणी शब्बीर लक्कडशाह यांच्या डोळ्यात गेल्याने त्यांनी लगेच आपल्या ताब्यातील दुचाकी मागे बसून असलेले त्यांचे बंधू मुर्तुजा यांच्या ताब्यात दिली. मात्र लुटारूंनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. याचवेळी लुटारूपैकी एकाने शब्बीर यांच्याजवळील बॅगच्या बेल्टला ब्लेड मारला. त्यामुळे बॅग खाली पडली. लुटारूंनी ती लगेच उचलून तेथून पोबारा केला.या घटनेची तक्रारी सोमवारी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी लगेच नाकाबंदी करून काही संशयित युवकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे.या घटनेने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
पाच लाखाची रक्कम घेऊन लुटारू पसार
By admin | Updated: September 9, 2015 00:57 IST