महाडोळी ग्रामस्थांचा पुढाकार : संगणक साक्षरतेचा निर्धारचिकणी : ज्या गावात आपला जन्म झाला, जिथे प्राथमिक शिक्षण घेऊन अनेकजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले त्या गावाचे ऋण फेडता यावे, या उदात्त हेतूने महाडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून ४५ हजारांची मदत देऊन संगणकाबरोबरच ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे यासाठी अनोखा प्रयत्न केला आहे.वरोरा तालुक्यात असलेले महाडोळी हे अत्यंत छोटेसे गाव. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ४० पटसंख्या असून दोन शिक्षक कार्यरत आहे. शाळेची इमारत अतिशय टुमदार असून शाळेत अनेक नवनवीन उपक्रम राबविल्या जात आहेत. गावातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून संगणकाद्वारे ज्ञान मिळावे स्पर्धेच्या युगात ते टिकून राहतील शिक्षणाचा ध्यास लागेल, या अनोख्या ध्येयाने झपाटून उठलेल्या गावकऱ्यांनी शाळेसाठी अवघ्या आठ दिवसांत ४५ हजार गोळा करून शाळेसाठी संगणक, प्रिंटर व मुलांचे आरोग्यासाठी वॉटर फिल्टर खरेदी केले व आदर्श निर्माण केला. त्याचे गावकऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख विद्या मोघे, मुख्याध्यापक माधव हाके, स.शि. रामचंद्र मेश्राम यांनी लोकार्पण केले. (प्रतिनिधी)
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ई-लर्निंगसाठी लोकवर्गणीतून जमविला ४५ हजारांचा निधी
By admin | Updated: November 1, 2015 01:14 IST