असंतोष : दोन महिन्याचे वेतन थकीत वरोरा : तालुक्यातील मोहबाळा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर नोव्हेंबर-२०१५ पासून ३७० कामगार कार्यरत आहेत. बालाजी असोसिएट, इन्फोटेक कंपनी, चेन्नई राधा या तिन्ही कंपन्यांनी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. वेतनापासून वंचित असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. बालाजी असोसिएट्स या संस्थेद्वारे मे. साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मोहबाळा ता. वरोरा येथे बालाजी असोसिएट, इन्कोटेक कंपनी, चेन्नई राधा या तिन्ही कंपन्यांमध्ये निरनिराळ्या तांत्रिक पदांवर ३७० कामगार नोव्हेंबर-२०१५ पासून कार्यरत आहे. या कंपन्या आपल्या कामगारांना कधीही वेळेवर वेतनाचे वाटप करीत नाहीत. कामगारांचे वेतन व्यवस्थापनाद्वारे थकीत ठेवण्यात येते. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने कामगारांगमध्ये असंतोष पसरला आहे. कामगारांतर्फे थकीत वेतन त्वरित देण्यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. मात्र व्यवस्थापनाने ताठर भूमिका घेत कामगारांना वेठीस धरले आहे. त्यामुळे कामगारांचा दिवसेंदिवस संयम सुटत चालला आहे. त्यांचे मनोधर्य खचले असून व्यवस्थापनाने थकीत अदा केले नाहीतर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. दैनंदिन व्यवहार, मुलांचे शिक्षण कसे करावे, काय खावे आणि काय करावे अशा अनेक समस्या कामगारांसमोर आवासून उभ्या ठाकल्या आहेत. अशीच परिस्थिती पुढे सुरू राहिली व तोडगा न निघाल्यास कामगारांना व्यवस्थापनानच्या विरोधात आंदोलन छेडल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत कामगारांनी व्यक्त केले आहे. अन्यायग्रस्त कामगारांनी चंद्रपूर येथील कामगार उपआयुक्तांना थकीत वेतनासंदर्भात निवेदन सादर केले आहे. मात्र आजतागायत तोडगा निघालेला नाही. यावर तत्काळ तोडगा काढला नाही तर कामगारांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढविण्याची शक्यता कामगारांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा कामगार रस्त्यावर उतरणार, हे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)
३७० कामगार वेतनापासून वंचित
By admin | Updated: March 12, 2017 01:35 IST