एसपींची उपस्थिती : भद्रावती शहरात पार पडला कार्यक्रमभद्रावती : गणेश उत्सव दरम्यान ध्वनी प्रदुषण टाळणाऱ्या येथील ३६ गणेश मंडळांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांच्या हस्ते सोमवारी नगरपरिषद सभागृह भद्रावती येथे एका कार्यक्रमात करण्यात आला.याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, अप्पर जिल्हा उप पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, एसडीपीओ पवार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार विलास निकम व न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी व्यासपिठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला भद्रावती येथील जवळपास सगळ्याच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.आपला विचार प्रवाह एकच आहे; आपण एकत्रीत राहतो. सगळ्या गोष्टी शेअर करतो, साजऱ्या करतो. त्यामुळे चांगल्या भावना वाढीस लागतात. आपसातील सद्भाव टिकुन राहतो, असाच सद्भाव दिर्घकाळ टिकुन राहण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन संदिप दिवाण यांनी उपस्थितांना केले. गणेश उत्सवादरम्यान शासनाने घालुन दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. ध्वनीप्रदुषण टाळणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहीत करण्यासाठी सन्मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. गणेशोत्सव तथा इतरही सणांच्या दरम्यान शांतता बाळगण्याचे आवाहन ठाणेदार विलास निकम यांनी प्रास्ताविकातून केले. सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रा. विवेक सरपटवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
ध्वनी प्रदूषण टाळणाऱ्या ३६ गणेश मंडळांचा सत्कार
By admin | Updated: September 15, 2016 00:57 IST