इरईच्या खोलीकरणाला पुन्हा सुरुवात : पडोली पूल ते दाताळा पुलापर्यंत अम्युझमेंट पार्क, लॅन्डस्केपिंग व वॉकिंग ट्रॅक मिलिंद कीर्ती चंद्रपूरशहरालगत वाहणाऱ्या इरई नदीचे पुनर्जीवन करण्याच्या कामाला चंद्रपूर पाटबंधारे विभागाने यावर्षी पुन्हा सुरुवात केली आहे. तेथे केवळ नदीचे खोलीकरणच करण्यात येणार नसून साबरमती नदीच्या धर्तीवर पडोली पूल ते दाताळा पुलापर्यंत नदी काठाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय जलसंधारण करण्यासाठी सिमेंट नाला बांध, दगडी व गॅबियन बंधारे, खोदतळे आदींसह सर्व मिळून सुमारे ३२५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इरईच्या पुनर्जीवनासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी नदीतील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले होते. त्यामुळे रहेमतपूर येथे इरई नदीला पूर आला नाही. सध्या चौराळा पुलाजवळ गाळ काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. सध्या १०० सहस्त्रघनमीटर खोलीकरण पूर्ण झाले आहे. हे खोलीकरण हडस्ती संगमापर्यंत करण्यात येणार आहे. त्यावर १८ कोटी ४७ लाख रुपये खर्च होणार आहेत. हे काम जून महिन्यापर्यंत चालणार आहे.गेल्या वर्षी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह पाणी परिषदेसाठी चंद्रपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी इरईच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम सूचविला होता. चर्चेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत नदी खोलीकरणाचे सनियंत्रण पाटबंधारे विभागाकडे सोपविले होते. त्यानुसार, नदी सौंदर्यीकरण व पुनरूज्जीवनाचा सुमारे ३२५ कोटी रुपयांचा आराखडा ७ जानेवारीला जिल्हाधिकारी सलील यांना सादर करण्यात आला आहे. त्यापैकी चंद्रपूर पाटबंधारे विभागाने यावर्षीही नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी, विद्युत प्रकल्प, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग असे विविध मोठे उद्योग असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात निसर्गाला बाधित करणार कचराही निघत असतो. इरई नदीच्या काठावर वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या कोळसा खाणी आहेत. या खाणीतील गाळ पाण्यासोबत नदीमध्ये वाहून जात असतो. कोळसा खाणीतील गाळ आणि चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातून निघणाऱ्या राखेमुळे इरई नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.म्हाडा करणार सौंदर्यीकरणगुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदी काठाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर इरई नदी चंद्रपूरकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. म्हाडाने सौंदर्यीकरण करण्याचे नियोजन केले आहे. पडोली पूल ते दाताळा पुलापर्यंत २५० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या भागात इरईच्या काठावर संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. त्यानंतर मुलांसाठी अम्युझमेंट-कम-वॉटर पार्क विकसित करण्यात येईल. मॉर्निंग वॉक करण्यासाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात येईल. लँड स्केपिंग करण्याचा प्रस्ताव आहे. हे काम बीओटी पद्धतीने करण्यात येणार आहे.वन विभाग व कृषी विभाग बंधारे बांधणारचंद्रपूर वन विभाग नाला खोलीकरण करणार असून सिमेंट नाला बांध, गॅबियन बंधारे तयार करण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे (बफर झोन) दगडी व गॅबियन बंधारे, तलाव खोलीकरण, खोदतळे, नवीन वनतलाव आदी विविध कामे आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाला खोलीकरण, बोडी नूतनीकरण, ढाही बांध, मजगी आदी कामे करणार आहे. इरईच्या धरणस्थळापासून खालील भागात नऊ साखळी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येईल.इरई नदीच्या खोलीकरणाचा लाभ होत आहे. गेल्या वर्षी रहेमतपूरला पूर आला नाही. जल व मृदसंधारणाची कामे केल्याने पावसाचे पाणी जमिनीत भरून भूगर्भातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होणार आहे. २०१३ मध्ये इरई काठावरील गावांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली होती. तो धोका आता पुन्हा निर्माण होणार नाही, याकरिता पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काम सुरू करण्यात आले आहे.-राजेश सोनोने, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर.
पुनरूज्जीवनासाठी ३२५ कोटींचा प्रकल्प
By admin | Updated: February 20, 2017 00:23 IST