सुधीर मुनगंटीवार: सावली वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पणसावली : आपल्या वनात ३३ प्रकारच्या वन उपज असून यातील काही वनऔषधी आहेत. या वन उपजातून पुढील पाच वर्षात ३०० कोटींचा व्यवसाय उभा करण्याचा वन विभागाचा मानस असल्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते. सावलीमधील सीमेंट रस्ते व नाली बांधकामासाठी डिसेंबरच्या अर्थ संकल्पात दोन कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. खासदार अशोक नेते, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार अतुल देशकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मूलच्या नगराध्यक्ष रिना थेरकर, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, उपविभागीय अधिकारी मनिषा लांडगे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक आर.एम.पवार, जि.प.सदस्य वैशाली कुकडे, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.डब्ल्यू.मोरे व सरंपच अतुल येरगुडे यावेळी उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिका-याचे कार्यालय सामान्य नागरिकांचे मदत केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा जेव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा तेव्हा वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. वनविभागाने गेल्या दहा महिन्यात लोकहिताचे ३९ निर्णय घेतले असून याचा जिल्हयातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. वनातून रोजगार कसा प्राप्त करता, येईल याचा विचार वनविभाग करत असून या दृष्टीने एक पाऊल वनधन जनधन विक्री केंद्राच्या रुपाने टाकण्यात आले आहे. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र व मेक इन चंद्र्रपूर यासाठी वनविभागही आपले योगदान देणार आहे. बांबूच्या नवीन प्रजाती तयार करणे, बांबू प्रशिक्षण केंद्र्र वनस्पती उद्यान, ताडोबा पर्यटन विकास, वन उद्यान अशा विविध मागार्ने विकास साधला जात आहे.वनव्याप्त क्षेत्र वाढविण्यासाठी ग्रीन आर्मी काढण्यात येणार असून पुढील पाच वर्षात वन उपजातून ३०० कोटींचा व्यवसाय उभा करण्याचा वनविभागाचा संकल्प आहे. सावली येथील सिमेंट रस्ते व नाली बांधकामासाठी डिसेंबरच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. गेल्या अर्थसंकल्पात मामा तलावासाठी १०० कोटी रुपये ठेवण्यात आले होते. येत्या चार वर्षात सर्व मामा तलावाचे नुतनीकरण, खोलिकरण व दुरुस्तीसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.शेतक-यांना शेतीसाठी लागणारा लाकुड फाटा वनविभागाने वेळेत व किफायतशिर दरात उपलब्ध करुन दयावा, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी आपल्या भाषणात केली. सावलीच्या विकासासाठी निधी दयावा, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले. वनउपज ही वनसंपत्ती असून वनऔषधीवर आधारित उद्योग आपल्या जिल्हयात उभारले जावेत, अशी अपेक्षा आमदार शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केली. काष्ठशिल्प कलेला प्रोत्साहित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे, असे त्या म्हणाल्या. या कार्यालयातून जनसामान्यांचे सर्व प्रश्न सुटावे अशी अपेक्षा शोभाताई फडणवीस यांनी केली. यावेळी माजी आमदार अतुल देशकर यांचे भाषण झाले. या कार्यक्रमात संयुक्त वनव्यवस्थापन समितीला पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी तर संचलन नासिर खान यांनी केले. या कार्यक्रमास सावली येथील असंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वन उपजापासून ३०० कोटींचा व्यवसाय उभारणार
By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST