जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : मुलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासनचंद्रपूर : कोलाम समाजाच्या अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासोबतच समाजाच्या विकासासाठी माझा पाठींबा राहिला. समाजाच्या लोकांचे बहुसंख्येने वास्तव्य असलेल्या सितागुढा, लचमागुडा सारख्या गावात पाणी, रस्ते आदी सुविधा निर्माण करू, असा विश्वास जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिला.जिवती तालुक्यातील अतीदुर्गम समजल्या जाणाऱ्या सितागुढा, लचमागुडा या गावातील कोलाम समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, तहसिलदार कुणाल पवार, जिवती पंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांच्यासह सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सितागुढा, लचमागुडा येथील कोलाम समाजाच्या नागरिकांना काही अडचणींमुळे जात प्रमाणपत्र मिळत नव्हते. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे सोईचे झाले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रमाणपत्राची मागणी असणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात आहे. सितागुढा येथे जात प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी दोन्ही गावातील जवळपास २२५ नागरिकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. गावातील रस्ते, पाणी या सुविधांसह रेशनकार्ड, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच वनहक्क कायद्यांतर्गत जमीन पट्टे वाटप आदी बाबी प्राधान्याने केल्या जातील, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. या गावात आपण वारंवार येत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार यांनी केले. ग्रामसेवकाने आभार मानले. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
जिवती तालुक्यातील २२५ कोलामांना मिळाले जात प्रमाणपत्र
By admin | Updated: October 24, 2016 00:53 IST