लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ३६ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि. २५) उघडकीस आली. याप्रकरणी हैदराबाद येथील ग्रँड फॉच्युन इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीच्या प्रमुखाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. टेकुला मुक्तीराज रेड्डी, रा. मुर्शिदाबाद, आंध्र प्रदेश असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेसाड़ी पोलिस हैदराबादला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
आरोपी टेकुला रेड्डी याने ग्रॅन्ड फॉच्युन इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनी हैदराबाद नावाची एक कंपनी स्थापन केली. कंपनीने विविध योजना तयार करून दामदुप्ट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. शिवाय, आकर्षक योजनांमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरले. कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. याविरुद्ध गडचांदूर येथील रेवनाथ आनंद एकरे यांनी चंद्रपुरातील रामनगर ठाण्यात तक्रार केली. त्यावरून १८ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१८ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होतो. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिस तपासात २ कोटी ३६ लाख ६० हजारांनी लोकांना फसविल्याचे उघडकीस आले.
रक्कम सर्वसामान्यांचीजादा पैसे मिळतील म्हणून नागरिकांनीच गुंतवणूक केली. तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी याच्याविरुद्ध रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ४०६, ४२०, ४६५, ५६८, ५७१, ३५ भादंवि सहकलम ३, ३ अन्वये गुन्हा दाखल केला.
"आजपावेतो ज्या गुंतवणूकदारांनी परिशिष्ट क्र. १ चे अर्ज भरून दिले नाही. त्यांनी आठ दिवसांत आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे जमा करावे. आरोपीचा सुगावा लागल्यास पोलिस नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्यावी."- प्रभाकर चिकनकर, पोलिस उपनिरीक्षक, रामनगर, चंद्रपूर