घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष नवा नाही. या वन्यप्राण्यांनी वर्षभरात पशू आणि मानवावर हल्ला केल्याच्या वर्षभरात २१३ घटना नागभीड वनपरिक्षेत्रात घडल्या आहेत. तळोधी वनपरिक्षेत्राची आकडेवारी वेगळीच आहे.
नागभीड तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टरमध्ये विस्तारले आहे. यापैकी १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील जंगलक्षेत्र लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी तळोधी (बाळापूर) येथे स्वतंत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील गोविंदपूर, कचेपार, गिरगाव, सोनापूर, वाढोणा, गंगासागर हेटी, जनकापूर, बाळापूर, देवपायली, बोंड, मिंडाळा, कोसंबी गवळी, मिंडाळा, नवेगाव हुंडेश्वरी, मौशी, ढोरपा, बालापूर खुर्द, पाहार्णी, म्हसली, कोरंबी, डोंगरगाव, नवखळा आदी परिसर तर चांगलाच जंगलव्याप्त आहे. या जंगल परिसरात अनेकदा लोकांना वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत असते. उल्लेखनीय बाब ही की, या व याशिवाय अन्य अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती या जंगलाला लागून आहेत. शेती आणि पशुधनाच्या निमित्ताने या गावांचा आणि शेतकऱ्यांचा रोजच जंगलाशी संबंध येतो. यातूनच वन्यप्राणी शेतकरी आणि पशुधनावर हल्ले करीत आहेत.
वर्षभरात २१ जणांना केले जखमीनागभीड वनपरिक्षेत्रात १ जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात २१ व्यक्तींवर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. यातील १० प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १९२ जनावरे मृत्युमुखी पडली असल्याची माहिती आहे. यातील १५६ अर्जदारांच्या अर्जाचा निपटारा करण्यात आला आहे. तर ३६ प्रकरणे तपासणीसाठी ठेवली आहेत.
नागरिकांमध्ये दहशतहिंस्त्र प्राणी वन्य प्राण्यांना आपली शिकार बनवत असतात. तर काही नाग- रिकांवरसुद्धा हल्ला केला आहे. या घटनांचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे दुर्लक्ष होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याने किंवा जखमी होत असल्याने त्या शेतकऱ्याचा वा त्याचा जो रोजचा व्यवहार आहे तो थांबत असतो. हे होऊ नये, यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करायला हव्यात.