चंद्रपूर : १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रावर पोलींग पार्ट्या पोहचविणे व आणण्याचे काम बसगाड्याव्दारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या १५ व १६ आॅक्टोबरला ग्रामीण भागातील काही बसफेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीम मशीन तसेच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याचा तसेच खाजगी वाहनांचा वापर होणार आहे. बसगाड्या अधिग्रहीत करण्याचे पत्र आगार प्रमुखांना पाठविण्यात आले असून, खाजगी वाहनेही अधिग्रहीत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.निवडणूकीच्या कामासाठी प्रशासनाला शेकडो बसगाड्यांची गरज पडते. दुर्गम भागात रस्त्यांअभावी अनेक अडचणी येतात. वेळेत मतदान साहित्य पोहचवून मतदान प्रक्रिया पार पाडणे, त्यानंतर साहित्य सुरक्षितरित्या जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ असते. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ईव्हीम मशीन पोहचविण्याचे काम वाहनांव्दारे होणार आहे. जिल्ह्यात १९०५ मतदान केंद्र असून निवणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पाच हजार जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी व तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मतदान केंद्रावर राहणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिमतील गृहरक्षक दलाचे ८०० जवान कार्यरत राहणार आहेत. तर पाच सीआरपीएफ कंपन्या बंदोबस्तात कार्यरत राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
निवडणूक कामासाठी १८० बसगाड्या
By admin | Updated: October 3, 2014 01:18 IST