चंद्रपूर: जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटत असल्याची ओरड नागरिकांमधून नेहमी होत आहे. ही ओरड कायमस्वरुपी बंद करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पाऊल उचलेल आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल त्यांचे अतिरिक्त वर्ग घेऊन त्यांना प्रवाहात आणण्यात येणार आहे.शुक्रवारी जिल्ह्यातील २६६ केंद्रामधील १६ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे परीक्षेनंतर जिल्ह्यातील इतर शाळांतील विद्यार्थ्यांची सरासरी गुणवत्ता काढण्यात येणार आहे. घेण्यात आलेल्या परीक्षेत शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मागण्यात आले होते.मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी काही शाळांमध्ये भेटी देवून पहाणी केली. यात काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आता शिक्षणविभाग, डायटचे प्राचार्य तसेच इतरांच्या मदतीने विविध उपक्रम सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली. निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
१६ हजार विद्यार्थ्यांनी दिली गुणवत्ता चाचणी
By admin | Updated: October 18, 2014 01:16 IST