नागभीड : तालुक्यातील हुमा येथून नागभीड पोलिसांनी १५० पोती मोहफूल व १५० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. हा मुद्देमाल साडेतीन ते चार लाख रूपये किमतीचा आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल जयसिंग सयाम, दिवाकर उरकुडा देशमुख, मनोज नामदेव तोरे, मुखरू बाबुराव सयाम सर्व रा. हुमा (खडकी) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. दारू गाळण्याच्या उद्देशाने या सर्वांनी गावापासून जवळच असलेल्या नाल्यात हे सर्व मोहफूल लपवून ठेवले होते.
हुमा जवळच्या नाल्यात मोहफूल लपवून ठेवले असल्याची ‘टीप’ नागभीड पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता मोहफुलांचे हे घबाड हाती लागले. ही कारवाई येथील ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव कोरवते, पीएसआय सतीश सोनोकर, अनिल सेडमाके, राजू सावसाकडे, चंद्रभान सोनवणे, रूपेश मुल्लेमवार यांनी केली.