सायाळा येथील तुषार शंकर लंबे हा आईसोबत राहात होता. ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेला तुषार हा शेतीकामात आईला मदत करीत होता. त्याच्या वडिलांचे तीन महिन्यापूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते. एक मुलगा आणि एक मुलगी यांचा साभाळ करून घरप्रपंच आई चालवीत होती. मुलीचे लग्न होऊन जेमतेम दोन वर्ष झाली होती. मुलीच्या नणंदचे लग्न ५ एप्रिल रोजी सायंकाळी असल्याने तुषारने आईला मुलीकडे नेऊन सोडले. भावकीत तेरवीचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी तोही लग्नाला जाणार होता. परंतु दुपारी राहत्या घरातच तुषारने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही वार्ता सायाळा गावात पसरताच गावातील काही नागरिकांनी उपरोक्त घटनेची माहिती त्याच्या मामाला कळविली. रात्री पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे पाठविला. साखरखेर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरजसिंग इंगळे करीत आहेत.
युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST