दुसरबीड : नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पूल नादुरुस्त झाला आहे़ पर्यायी व्यवस्था म्हणून खडक पूर्णा नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे़ मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे़ या कामाची गती वाढविण्याची मागणी हाेत आहे़
दुसरबीड येथून जवळच असलेला खडकपूर्णा नदीवरील पुलाची गत काही महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली हाेती़ या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने, तसेच पूल शिकस्त झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली हाेती़ त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची वाहतूक बंद करण्याची उपाययोजना केली नाही़ केवळ काही वाहनांना वाहतूक बंदी असून, लोखंडी सळ्या घेऊन जाणारी वाहने पुलावरून धावत असल्याचे चित्र आहे़ पुलाचे काम सुरू झाले असले तरी संथगतीने सुरू आहे़ पावसाळा एक महिन्यावर आला असून, ताेपर्यंत पुलाचे काम न झाल्यास वाहतूक ठप्प हाेणार आहे़ त्यामुळे कंत्राटदाराला पुलाच्या कामाची गती वाढविण्याचे आदेश देण्याची मागणी आहे़