बुलडाणा: विविध घटकांतील व दारिद्रय़रेषेखालील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्य शासन विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करीत असते. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत हे महामंडळाचा कारभार चालतो; मात्र मागील चार- पाच वर्षापासून एकाही आर्थिक विकास महामंडळाला राज्य शासनाने निधीच उपलब्ध करून दिला नसल्यामुळे हे महामंडळ पांढरे हत्ती ठरत आहेत. मागील काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये ३00 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यामुळे या मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम सध्या पोलीस कोठडीत आहेत. महामंडळाच्या पाच जिल्ह्यांतील जिल्हा व्यवस्थापकांच्या संगनमताने हा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळे पाच जिल्हा व्यवस्थापक व त्यांच्या सोबत लेखाधिकारी सध्या निलंबीत करण्यात येवून त्यांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बुलडाणा येथील महामंडळाचा सुध्दा समावेश असल्यामुळे येथील जिल्हा व्यवस्थापक पी.टी.पवार, लेखापाल व्ही.सी. जाधव हे सध्या निलंबीत आहेत. व्यवस्थापक पी.टी.पवार, लेखापाल व्ही.सी. जाधव व तत्कालीन रोजंदार शिपाई राजू मोरे यांनी संगनमत करून एकाच महीण्यात ५ कोटी ९८ लाख रुपयाची रक्कम परस्पर काढून गैरव्यवहार केल्याचे चौकशी समितीने केलेल्या चौकशीत उघड झाले होते. सध्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा पदभार अकोला येथील व्यवस्थापक श्रीराम राव यांचेकडे असून येथे केवळ दोन कर्मचारी आहेत. सध्या या महामंडळाचे स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि महाराष्ट्र बँकेत असलेले सर्व खाते सील करण्यात आले आहेत. वसुली सध्या ठप्प झाली असून, कोणत्याही योजनेवर निधी नसल्यामुळे या कार्यालयाकडे कोणी फिरकतसुद्धा नाही.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे काम ठप्प
By admin | Updated: October 15, 2015 00:23 IST