अमडापूर : जानेफळ ते अमडापूर रस्त्याची दुरावस्था झाली हाेती. या रस्त्याचा दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, दुरुस्तीचे काम दर्जाहीन असल्याने एक महिन्यात पॅचेस उखडल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम दर्जेदार करण्याचे आदेश कंत्राटदारास देण्याची मागणी हाेत आहे.
गेल्या एक महिन्यापासून अमडापूर ते जानेफळ रस्ता दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र, हे काम अजून पूर्णही झाले नसताना उखडण्यास सुुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम अगदीच निकृष्ट दर्जाचे होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकींसह, विविध वाहनांनी ही गिट्टी उडत असून पादचाऱ्यांना लागत आहे. महिनाभरातच पॅचेस उखडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अमडापूर-जानेफळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राम डहाके, समाधान सुपेकर यांनी सा. बां. विभागाकडे निवेदन दिले हाेते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात झाली. परंतु संबंधित ठेकेदाराने थातूरमातूर काम सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रस्त्यांची स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी हाेत आहे.